वाशिम : राज्यात मिनी लॉकडाऊनची घोषणा करताना राज्य सरकारने फेरीवाल्यांना प्रत्येक दीड हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार रिसोड शहरातील ८०० आणि वाशिम शहरातील ११०० अशा एकूण १९०० फेरीवाल्यांना दीड हजाराचा लाभ मिळणार आहे.
राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यापूर्वी निर्बंध कडक करण्यात आले होते. मात्र, कोेरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने १३ एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्बंध अधिक कठोर करण्याची घोषणा केली. मिनी लॉकडाऊनमुळे गोरगरीब नागरिक, फेरीवाले आदींना थोडाफार दिलासा म्हणून नोंदणी केलेल्या फेरीवाल्यांना प्रत्येक दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. रिसोड नगर परिषदेंतर्गत ८०० फेरीवाल्यांची नोंद आहे. वाशिम नगर परिषदेंतर्गत फेरीवाल्यांची नोंद नाही; मात्र यापूर्वी केंद्र सरकारने फेरीवाल्यांसाठी जाहिर केलेले अर्थसहाय्य देण्यासाठी ११०० फेरीवाल्यांना अधिकृत प्रमाणपत्र दिले होते. यानुसार या फेरीवाल्यांना मदत मिळाली होती. याच धरतीवर मदत मिळाली तर वाशिम शहरातील ११०० फेरीवाल्यांना याचा लाभ होऊ शकतो, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. फेरीवाल्यांच्या बँक खात्यात दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य जमा केले जाणार असल्याने बँक खाते, आधार कार्ड व अन्य कागदपत्रे जमा केली जाणार आहेत. ही कार्यवाही वरिष्ठांच्या सूचनेनुसार केली जाणार आहे.
0000
कोट बॉक्स
मिनी लॉकडाऊनमुळे आमच्यासमोर बिकट आर्थिक प्रश्न निर्माण होतो. एक महिनाभर कडक निर्बंध असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा? हा प्रश्न आहे. सरकारने जाहिर केलेल्या मदतीचा थोडाफार दिलासा मिळू शकेल.
- अ. हबीब अ. कय्यूम
00
मिनी लॉकडाऊन असल्याने रोजगाराचा प्रश्न उभा ठाकला आहे. दीड हजार रुपये जाहिर केले आहेत. मात्र, ही रक्कम नेमकी केव्हा मिळणार हे अजून स्पष्ट नाही. फेरीवाल्यांना यामुळे थोडाफार दिलासा मिळाला.
- शुभम कांबळे
००००
रिसोड शहरात ८०० फेरीवाल्यांची नोंद आहे. या फेरीवाल्यांना राज्य सरकारच्या नवीन घोषणेनुसार दीड हजार रुपयांची मदत मिळणार आहे. वरिष्ठांच्या सुचनेनुसार या योजनेची अंमलबजावणी केली जाईल.
- गणेश पांडे,
मुख्याधिकारी, नगर परिषद रिसोड
००००
काय समस्या..
मिनी लॉकडाऊनमुळे धंदा कसा करावा हा महत्वाचा प्रश्न आहे.
००००
जिल्ह्यातील नोंदणीकृत फेरीवाले
१९००
००