वाशिम : जवाहर नवोदय विद्यालय, वाशिम येथील वर्ग नववीच्या रिक्त एका जागेसाठी २४ फेब्रुवारी रोजी १९२ विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार आहेत.जवाहर नवोदय विद्यालय वाशिम येथे सहावी, नववी व अन्य वर्गातील रिक्त जागांसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येते. इयत्ता नवव्या वर्गातील एका जागेसाठी यापूर्वी १३ फेब्रुवारी रोजी प्रवेश परीक्षा होणार होती. परंतू, काही तांत्रिक कारणामुळे ही परीक्षा आता २४ फेब्रुवारी रोजी स्थानिक जवाहर नवोदय विद्यालय वाशिम या एकमेव परीक्षा केंद्रात आॅफलाईन पद्धतीने होणार आहे. एका जागेसाठी १९२ विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी झाली आहे. सध्या कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रवेश परीक्षा घेताना कोरोनाविषयक नियमांची अंमलबजावणी म्हणून शाळा प्रशासनातर्फे योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्याचे नवोदय विद्यालयाचे प्राचार्य रवीन्द्र चंदनशिव यांनी सांगितले. या परीक्षेसाठी प्रवेश अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांनी आपले प्रवेशपत्र नवोदय विद्यालय समितीच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घ्यावे, विद्यार्थ्यांनीदेखील आॅफलाईन पद्धतीने प्रवेश परीक्षा देताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही चंदनशिव यांनी केले.
एका जागेसाठी १९२ विद्यार्थी देणार ‘नवोदय’ची प्रवेश परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 6:37 PM