वाशिम : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान दिले जात आहे. तथापि, योजनेसाठी पात्र नसतानाही अर्ज केलेले ४ हजार ८५८ शेतकरी अपात्र ठरले आहेत तर सात हजारांवर शेतकरी होल्डवर आहेत.
योजनेंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यासांठीही ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू आहे. वाशिम जिल्ह्यातून ३४ हजार १४१ शेतकऱ्यांची खाते पोर्टलवर अपलोड करण्यात आली. त्यापैकी २२ हजार ३८४ शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक प्राप्त झाल्याने त्यांना अनुदानाचा मार्ग मोकळा झाला. त्यातील आतापर्यंत २१ हजार ८७० शेतकऱ्यांच्या खात्यात ९० कोटी २२ लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत. काही शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक प्राप्त झाला नसल्याने ते अपात्र आहेत की, पात्र असा संभ्रम शेतकऱ्यांमध्ये होता. त्यामुळे सहकार आयुक्तांनी अपात्र आणि होल्डवर असलेल्या शेतकऱ्यांची यादी कारणांसह जिल्हा सहकार विभागाला नुकतीच पाठविली आहे. त्यामध्ये २ हजार २६९ शेतकऱ्यांनी यापूर्वी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतल्याने त्यांना अपात्र करण्यात आले.
सहकारी संस्थांचे पदाधिकारी १, निमशासकीय कर्मचारी, अधिकारी ६, आयकर भरणा करणारे १ हजार ८१८ आणि शासकीय सेवेत असलेले ७१४ शेतकरी असून एकूण ४ हजार ८५८ शेतकरी अपात्र ठरविण्यात आले आहेत. त्याशिवाय निकषांत न बसणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी असून ते खातेही होल्डवर ठेवण्यात आले आहेत. त्यांनाही योजनेचा लाभ मिळणार नसल्याची चिन्हे आहेत.पात्र शेतकऱ्यांना ९०.२२ कोटी वाटपजिल्ह्यात आतापर्यंत प्राप्त झालेल्या यादीमध्ये नाव समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांनी केवासयी केल्यानंतर शासनस्तरावरून थेट बँक खात्यात अनुदानाची रक्कम वर्ग करण्यात आली. जिल्ह्यातील २१ हजार ८७० शेतकऱ्यांच्या खात्यात ९० कोटी २२ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. केवायसी केलेले केवळ ३३६ शेतकऱ्यांना अनुदान देणे शिल्लक आहे.