वाशिम : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत १४ वा हप्त्याने अनुदान गुरुवार, २७ जुलै रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहे. ज्या लाभार्थी शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि आधार सिडिंग पूर्ण केले आहे. त्यांना अनुदान मिळेल, पण ज्यांनी अजूनही ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, त्या ३० हजार ४८७ शेतकऱ्यांचे काय? असा प्रश्न आहे.
केंद्र शासनाने शेतकरी कुटुंबांना निश्चित उत्पन्न देण्यासाठी १ फेब्रुवारी २०१९ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. योजनेतंर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी तीन टप्प्यांत प्रत्येकी २ हजार याप्रमाणे ६ हजार रुपयांचे अनुदान लाभार्थींच्या खात्यात वर्ग केले जाते. योजनेचे आतापर्यंत १३ हप्त्याचे अनुदान शेतकऱ्यांना मिळाले आहे. १४ वा हप्ता कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. अखेर २७ जुलैला देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान वर्ग करण्याचा निर्णय घेतला असल्याचे अधिकृत पोर्टलवर शुक्रवारी दिसून आले. दरम्यान, पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणली असून त्याचा पहिला हप्ताही याच दिवशी मिळण्याची शक्यता आहे. ई-केवायसी, आधार सिडिंग नसलेल्या शेतकऱ्यांचे अनुदान लटकणार असल्याचे चिन्हे आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजूनही ही प्रक्रिया पूर्ण केली नसेल त्यांनी हप्त्यापूर्वी ई-केवायसी आणि आधार सिडिंग पूर्ण करणे आवश्यक आहे. ३०४८७ जणांचे केवायसी, आधार सिडिंग शिल्लकजिल्ह्यात ॲक्टीव्ह शेतकऱ्यांपैकी १ लाख ५७ हजार ५६८ जणांनी ई-केवायसी पूर्ण केली असून १६ हजार ९५३ लाभार्थींची शिल्लक आहे. आधार प्रमाणीकरण असलेल्या शेतकऱ्यांपैकी १ लाख ५७ हजार ७९ लाभार्थींनी आधार सिडिंग पूर्ण केले असून १३ हजार ५३४ शिल्लक आहेत.