वाशिम - विद्यार्थ्यांना कौशल्य विकास अभ्यासक्रमांची ओळख करून देण्याच्या दृष्टिकोनातून वाशिम तालुक्यातील पार्डी टकमोर येथील पारेश्वर विद्यालयात २४ व २५ जानेवारीला ‘खरी कमाई’ उपक्रम राबविण्यात आला. विविध प्रकारचे १०० स्टॉल लावण्यात आले असून, यामधून जवळपास २० हजार रुपयांची उलाढाल झाली.
विद्यार्थ्यांना कौशल्य विकास अभ्यासक्रमांची ओळख करून द्यावी, त्याचप्रमाणे दहावी, बारावी उत्तीर्ण होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना कामाचा अनुभव मिळावा, शालेय स्तरापासूनच शिक्षण उद्योगाभिमुख करण्यात यावे आदी मुद्दांच्या अनुषंगाने शाळांमध्ये खरी कमाई, आनंद मेळावा आदी उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमांतर्गत विविध प्रकारच्या वस्तू तयार करून त्याची विक्री शाळास्तरावर केली जाते. पार्डी टकमोर येथील पारेश्वर विद्यालयात खरी कमाई हा उपक्रम राबविण्यात आला असून, विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची जवळपास १०० दुकाने (स्टॉल) लावली होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य बाबाराव राठोड तर उदघाटक म्हणून रामेश्वर ढोबळे होते. खरी कमाई या उपक्रमांतर्गत विद्यार्थी हेच मालक व ग्राहक बनले होते. विविध प्रकारच्या खाद्यपदार्थ विक्रीतून २० हजार रुपयांची उलाढाल झाली. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच उद्योग, धंदा, दैनंदिन व्यवहार, खरेदी-विक्रीचा अंदाज यासह अन्य माहिती देण्यात आली. प्राचार्य बाबाराव राठोड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षक हरीष चौधरी, राजकुमार परळीकर, विनोद जैस्वाल, महेश उगले, स्वाती वाटाणे, शुभांगी कांबळे, विनायक चौधरी, पुरुषोत्तम चौधरी, गजानन चौधरी, श्रीकांत ढोबळे आदींची उपस्थिती होती.