वाशिम : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा पंधरा वा हप्ता उद्या, १५ नोव्हेंबरला वर्ग केला जाणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते झारखंड राज्यातील खुंटी येथून सकाळी ११:३० वाजता देशभरातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात भाऊबीजच्या दिवशी दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत.
केंद्र शासनाने शेतकरी कुटुंबांना निश्चित उत्पन्न देण्यासाठी १ फेब्रुवारी २०१९ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंमलात आणली. योजनेच्या अनुदानामुळे पात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. योजनेअंतर्गत १४ वा हप्त्याचे वितरण २७ जुलैला करण्यात आले. त्याचा लाभ १ लाख ४५ हजार ६५८ शेतकऱ्यांना झाला. त्यानंतर पीएम किसान योजनेच्या लाभासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांनी केवायसी, आधार सिडिंग पूर्ण केल्यामुळे शेतकरी संख्येत भर पडली आहे.
राज्य शासनाने सुरु केलेल्या नमो महासन्मान योजनेचा पहिला हप्ता दिवाळीपूर्वी मिळाल्याने पीएम किसानचा १५ वा हप्ता दिवाळीपूर्वी मिळेल की नाही याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. तथापि, केंद्र शासनाने हा हप्ता देण्यासाठी तारीख निश्चित केले असल्याचे पीएम किसान पोर्टलवर सोमवारी पहावयास मिळाले.
दीड लाखांवर लाभार्थींना होणार लाभपीएम किसान योजनेचा १४ वा हप्ता १ लाख ४५ हजारांवर शेतकऱ्यांना मिळाला. यावेळी केवायसी, आधार सिडिंग न केलेल्या शेतकऱ्यांना दोन हजार मिळाले नाही. त्यानंतर मात्र ही प्रक्रिया पूर्ण केल्यामुळे पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. गत काही दिवसांपूर्वी पीएम किसानच्या १५ व्या हप्त्यासाठी पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या निश्चित करण्यात आली होती. जिल्ह्यातील दीड लाखांवर शेतकऱ्यांना बुधवारी २ हजार रुपयांचा १५ वा हप्ता मिळणार आहे. दरम्यान, केवायसी आणि आधार सिडिंग न केलेल्या लाभार्थींना हा हप्ता मिळणार नसल्याची चिन्हे आहेत.