शिरपूर जैन: शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या रिसोड तालुक्यातील गोवर्धना येथे दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. १४ एप्रिल रोजी २१० कोरोना रुग्ण आल्याने रुग्णसंख्या ३००च्या वर पोहोचली आहे.
कोरोना रुग्णांच्या संख्येने परिसरामध्ये चिंता पसरली आहे. शिरपूरपासून १६ किलोमीटर अंतरावर असलेल्या गोवर्धना येथे मागील काही दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. चार दिवसापूर्वी दोघा जणांचा कोरोना आजाराने मृत्यू सुद्धा झाला आहे. मागील आठवड्यात पंधरा-वीस, चाळीस-पंचेचाळीस, रुग्ण नियमित निष्पन्न होत होते. मात्र १४ एप्रिल रोजी एकदम २१० रुग्ण बाधित असल्याचे निष्पन्न झाले. सध्या गोवर्धन येथे ३०० हून अधिक कोरोना रुग्ण आहेत. त्यामुळे गोवर्धनासह परिसरातील गावात चिंता पसरली आहे. गोवर्धनासारख्या अति लहान गावांमध्ये एकाच दिवशी २१० रुग्ण निष्पन्न होणे हे आरोग्य विभागासह प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. आरोग्य विभागाकडून नियमित कोरोना टेस्ट केल्या जात आहेत. जवळपास तीन ते साडेतीन हजार लोकसंख्या असलेल्या गोवर्धना येथे आरोग्य विभागाकडून आतापर्यंत एक हजार नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यात आली. लसीकरणाचे काम सुरू आहे. तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक अंगणवाडी सेविका,आशा, पोलीस सतत गोवर्धना येथे कार्यरत असल्याचे प्रशासनाकडून तहसीलदार अजीत शेलार यांनी सांगितले. गोवर्धना येथील उर्वरित नागरिकांनी मनात भीती न बाळगता कोरोना टेस्ट करून घ्यावी, असे आवाहनसुध्दा तहसीलदार शेलार यांनी केले.
बॉक्स....
संपूर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित
सध्या गोवर्धना येथे तीनशेहून अधिक कोरोना रुग्णांची संख्या आहे. काही रुग्णावर वाशिम व सवड येथील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. तर काही कोरोना बाधितांचे गावातील शाळेमध्ये विलगीकरण करण्यात आले आहे. संपूर्ण गावाला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.