आंतरजिल्हा बदली प्रकरण : जिल्ह्यातून ७४ शिक्षकांची बदलीवाशिम : मे महिन्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने राबविल्यानंतर, जून महिन्यात शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीवर शिक्कामोर्तब झाले. त्यानुसार अन्य जिल्ह्यातील २१३ शिक्षक वाशिम जिल्ह्यात येणार असून, वाशिममधील ७४ शिक्षक परजिल्ह्यात बदलीस पात्र ठरले आहेत.गत काही वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया बंद असल्याने शिक्षकांना विविध गैरसोयींना सामोरे जावे लागले. आंतरजिल्हा बदली प्रकरण निकाली काढण्याची मागणी विविध शिक्षक संघटनांकडून वारंवार झाली. शासनस्तरावर या मागणीचा सकारात्मक विचार झाल्याने आंतरजिल्हा बदली प्रकरणी शासनाने २४ एप्रिल २०१७ अन्वये सुधारीत धोरण निश्चित केले. त्यानुसार इच्छूक शिक्षकांकडून संबंधित पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागविले होते. ही प्रक्रिया मे महिन्यात पार पडली. त्यानंतर जून महिन्यात शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानुसार अन्य जिल्ह्यातील एकूण २१३ शिक्षक वाशिम जिल्ह्यातील रिक्त पदांवर बदलीस पात्र ठरले आहेत तर वाशिम जिल्ह्यातील एकूण ७४ शिक्षक अन्य जिल्ह्यात बदलून जाणार आहेत. प्रशासकीय सोपस्कार पार पडल्यानंतर २१३ शिक्षक वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त पदांवर सामावून घेतले जाणार आहेत.
परजिल्ह्यातील २१३ शिक्षक वाशिमात रूजू होणार !
By admin | Published: July 02, 2017 1:41 PM