वाशिम : प्राधान्य कुटुंब तसेच अंत्योदय योजनेच्या २.३० लाख शिधापत्रिकाधारकांना यापुढे रेशनवर ज्वारी व मका मिळणार आहे; मात्र त्यासोबतच रेशनच्या ५० टक्के गव्हाला मुकावे लागणार आहे. दुसरीकडे १४ हजार ७३९ शेतकरी लाभार्थ्यांना मात्र रेशनच्या मका, ज्वारीतून वगळण्यात आले आहे.
दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच निराधार, गोरगरीब लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत रेशनच्या अन्नधान्याचा लाभ दिला जातो. जिल्ह्यात दोन लाख ७८ हजार १५० शिधापत्रिका असून, अंत्योदय, प्राधान्य कुटुंब व एपीएल शेतकरी लाभार्थ्यांना गहू व तांदळाचा लाभ दिला जातो. जानेवारी महिन्यापर्यंत प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेंतर्गत प्रति लाभार्थी ३ किलो गहू २ रुपये प्रति किलो दराने व २ किलो तांदूळ ३ रुपये प्रति किलो दराने तसेच अंत्योदय कार्डधारकांना प्रतिकार्ड १५ किलो गहू २ रुपये प्रति किलो दराने व २० किलो तांदूळ ३ रुपये प्रति किलो दराने वितरित करण्यात आला. फेब्रुवारी महिन्यात यामध्ये बदल केला असून प्राधान्य कुटुंब तसेच अंत्योदय योजनेंतर्गतच्या लाभार्थींचे गव्हाचे प्रमाण ५० टक्के कमी करून त्याठिकाणी ४० टक्के मका व १० टक्के ज्वारीचे वितरण केले जाणार आहे. मका व ज्वारीचा विक्री दर प्रति किलो १ रुपया आहे. याचा लाभ जिल्ह्यातील एक लाख ८१ हजार १०९ प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक व ४८ हजार ९७० अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना मिळणार आहे. या योजनेतून एपीएल शेतकरी शिधापत्रिकाधारकांना वगळण्यात आल्याने १४ हजार ७३९ लाभार्थ्यांना रेशनवरील मका व ज्वारी मिळणार नाही.
०००
बॉक्स
जिल्ह्यातील एकूण शिधापत्रिका २,७८,१५०
अंत्योदय शिधापत्रिका४८,९७०
प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका१,८१,१०९
एपीएल शेतकरी शिधापत्रिका१४,७३९
बॉक्स
मका व ज्वारीचा प्रति किलो विक्री दर - एक रुपया
००००००००
कोट बॉक्स
फेब्रुवारी महिन्यापासून प्राधान्य कुटुंब तसेच अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिकाधारकांचे गव्हाचे प्रमाण ५० टक्के कमी करून, त्याऐवजी ४० टक्के मका व १० टक्के ज्वारीचे वितरण करण्यात येत आहे. मका व ज्वारीचा प्रति किलो विक्री दर एक रुपया आहे.
- सुनील विंचनकर,
जिल्हा पुरवठा अधिकारी
००००००
कोट बॉक्स
फेब्रुवारी महिन्यापासून रेशनवर मका व ज्वारी मिळणार आहे, ही बाब स्तुत्य व चांगली आहे. रेशनवरील मका व ज्वारीचा दर्जा उत्कृष्ट असायला हवा, अशी लाभार्थ्यांची अपेक्षा आहे. रेशनवर साखरदेखील मिळायला हवी.
- बाबुराव वानखडे,
लाभार्थी.