वाशिम : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महत्वपूर्ण समजली जाणारी नीट परीक्षा रविवार, ७ मे रोजी होणार आहे. वाशिम शहरात त्यासाठी सहा परीक्षा केंद्र राहणार असून २३३८ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ होतील.
नीट परीक्षा आयोजनाबाबत शहरातील श्री शिवाजी विद्यालयात शनिवारी वाशिम शहरातील सर्व केंद्र संचालक, प्रमुखांची सभा घेण्यात आली. त्यामध्ये वाशिम शहराचे परीक्षा समन्वयक प्राचार्य अरूण सरनाईक यांनी मार्गदर्शन केले. सर्व परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार असून दुपारी २ ते ५ या वेळेत परीक्षा घेतली जाणार आहे.
परीक्षा तयारीच्या अनुषंगाने ६ मे रोजी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी केंद्र संचालक, प्रमुख यांच्यासह इतर संबंधित कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. शहरातील आर.ए. कॉलेज, हॅप्पी फेसेस द कन्सेप्ट स्कूल, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, शिवाजी हायस्कूल आणि ज्यू. काॅलेज या सहा केंद्रावर परीक्षा होणार आहे.