लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या निर्णयाची घोषणा केली. याअंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ होणार असून, जिल्ह्यातील २.४० लाख शेतकरी कर्जमाफीस पात्र होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.सोयाबीन, तुरीला भाव नाही, विपरीत हवामानामुळे उत्पादनाची हमी राहिलेली नाही. अशा स्थितीत कर्ज फेडणे अशक्य झाल्याने शासनाने कर्जमाफीचा निर्णय जाहीर करावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी भाजीपाला, दूध फेकून देणे, रास्ता रोको आंदोलनासह विविध स्वरूपात शासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. त्याचे सकारात्मक परिणाम झाले असून, आज मुंबईत पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत दीड लाख रुपयांपर्यंत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. या निर्णयामुळे वाशिम जिल्ह्यातील २.४० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, कर्जमाफीचा निर्णय जाहीर होताच मानोरा येथील शेतकऱ्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. इतरही ठिकाणी राज्य शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.
वाशिम जिल्ह्यात २.४० लाख शेतकरी कर्जमाफीस पात्र!
By admin | Published: June 25, 2017 8:57 AM