शिरपूर (वाशिम) - जैन बांधवांचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या शिरपूर जैन येथे भगवान अंतरिक्ष पार्श्वनाथ यांची २३.५ फूट उंच काळ्या पाषाणाची मूर्ती स्थापित करण्यात येणार आहे. यासाठी लागणा-या २४० टन वजनाची अखंड शिळा शिरपूर येथे महिनाभराच्या प्रवासानंतर बुधवारी ( 1 नोव्हेंबर) दाखल झाल्याबरोबर गावात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जिल्ह्यासह जिल्हा बाहेरीलदेखील शेकडो भाविकांनी उपस्थिती लावली होती.
शिरपूर येथील पारस बाग परिसरात भगवान अंतरिक्ष पार्श्वनाथ यांची २३.५ फूट उंच काळ्या पाषाणाची मूर्ती स्थापित करण्यात येणार आहे. ही मूर्ती घडविण्यासाठी एका भव्य आणि अखंड शिळेची आवश्यकता होती. शिळा राजस्थानमधील भिलवाडा येथून महिनाभराच्या प्रवासानंतर शिरपूर जैन पोहोचल्यानंतर ग्रामपंचायत व भाविकांच्यावतीने मिरवणूक काढण्यात आली. रिसोड फाटा ते बसस्थानकादरम्यान काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये जैन मुनी विमलहंसजी महाराज, परमहंस विजयजी महाराज व अन्य जैन मुनी उपस्थितीत होते. यावेळी सरपंच सुनिता अंभोरे, गणेश अंभोरे, विजय अंभोरे, निलेश शर्मा, रेणुका शर्मा यांच्यासह भाविकांनी या शिळेचे पूजन केले.