इंझोरी: मानोरा तालुक्यातील मोठा बाजार म्हणून प्रसिद्ध असलेल्या इंझोरी येथील आठवडी बाजाराची स्थिती गेल्या अनेक वर्षांपासून दयनीय झाली होती. आता या बाजाराची कळा बदलणार असून, महाराष्ट्र स्पर्धात्मक कृषी विकास प्रकल्पांतर्गंत या बाजारात सोयीसुविधांसाठी जागतिक बँक प्रोजेक्टमधून २५ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीच्या आधारे कामे करण्यास प्रारंभही करण्यात आला आहे.
वाशिम जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये इंझोरी येथील ग्रामपंचायतीचा, तसेच मोठ्या आठवडी बाजारात येथील आठवडी बाजाराचा समावेश आहे. मानोरा तालुक्यासह जिल्हाभरातील व्यावसायिक येथे येत असतात. तालुक्यातील १० गावांतील हजारो ग्राहकही विविध खरेदीसाठी येथे येतात. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या बाजाराची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. व्यावसायिकांसाठी शेड, ओटे, तसेच इतर आवश्यक सुविधांचाही अभाव होता. जमिनीवर घाणीच्या सानिध्यातच भालीपाल्याची विक्री होत असे, त्यामुळे भाजीपाल्यावर जंतुंचा प्रादूर्भावही होण्यास वाव होता. ही बाब लक्षात घेत येथील सामाजिक कार्यकर्ते अजय जयस्वाल यांनी या बाजाराची कळा बदलण्यासाठी पुढाकार घेत आमदार राजेंद्र पाटणी यांच्या माध्यमातून शासनाकडे बाजारात सुविधा उपलब्ध करण्यासाठी निधीची मागणी केली. त्यांच्या मागणीचा विचार करून राजेंद्र पाटणी यांनी सहकारविभागाकडे इंझोरीच्या बाजाराचा प्रस्ताव पाठविल्यानंतर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी महाराष्ट्र स्पर्धात्मक कृषी विकास अंतर्गत जागतिक बँक प्रोजेक्टमधून इंझोरीच्या आठवडी बाजारासाठी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. या निधीमधून इंझोरीच्या आठवडी बाजारात टीन शेड, बाजार ओटे, पेव्हर ब्लॉक रस्त्यांसह व्यावसायिक आणि ग्राहकांसाठी सुलभ शौचालय उभारणीच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. या कामांचे उद्घाटन १३ फेब्रुवारीलाच सरपंच विणादेवी जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले.