वाशिम, दि. १६-दिव्यांगांसह दुर्बल व वंचित घटकातील बालकांना नामांकित खासगी शिक्षण संस्थेत २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश घेण्याला १८ मार्चपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी दिनकर जुमनाके व उपशिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी दिली.शिक्षण हक्क कायद्याने दिव्यांग, मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांंना मोफत प्रवेश देण्याचे बंधन खासगी शाळांना घालून दिले. यासाठी जिल्हय़ात आरटीईअंतर्गत पात्र ठरलेल्या शाळांमध्ये ऑनलाइन प्रवेश अर्जाची प्रक्रिया राबविण्यात आली. प्राप्त प्रवेश अर्जांंमधून लॉटरी पद्धतीने प्रवेश दिले जात आहेत. मोफत प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर पालकांनी प्रत्यक्ष शाळेत जाऊन पाल्याचा प्रवेश घेण्याची कार्यवाही सुरू झालेली आहे. शाळेत जाऊन प्रत्यक्ष प्रवेश घेण्याची अंतिम मुदत १५ मार्च अशी होती; मात्र मध्यंतरी होळी व रंगपंचमीच्या दीर्घ सुट्यांमुळे प्रवेशाची मुदत वाढविण्याची मागणी विविध पालक संघटनांनी केली. या मागणीची दखल घेऊन आता १८ मार्चपर्यंंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती जुमनाके व मानकर यांनी दिली. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या लॉटरीतून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांंना शाळेत जाऊन १८ मार्चपर्यंंत प्रवेश घेता येणार आहे. पालकांनी या मुदतवाढीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी जुमनाके यांनी केले.
२५ टक्के मोफत प्रवेशाला मुदतवाढ!
By admin | Published: March 17, 2017 2:46 AM