- शिखरचंद बागरेचा लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतकरी गट, शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या फळपिकांसह इतर उत्पादनांची विक्री व प्रक्रियेसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध कारण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात ‘कृषी मॉल’ उभारणीस गतवर्षी मंजुरी मिळाली. त्यासाठी कृषी विभागाला २.५० कोटींचा निधीही प्राप्त झाला; परंतु कोरोना संसर्गामुळे नव्या उपक्रमांतील कामांना शासनाने स्थगिती दिली. त्यामुळे या कृषी मॉल उभारणीची प्रक्रिया थंड बस्त्यात पडली आहे.जिल्ह्यात पपई, डाळींब, पेरू, मोसंबी, संत्रा, द्राक्ष, आंबा, केळी, चिकू, टरबूज, खरबूज, सिताफळ आदि फळपिकांचे उत्पादन घेण्यात येते. जिल्ह्यात जवळपास ४ हजार ५०० हेक्टर क्षेत्रात फळपिकांची लागवड आहे. त्यात सतत वाढ होत आहे. जिल्ह्यात ११ फळप्रक्रिया केंद्र असले तरी ती पुरेशी नाहीत. शिवाय योग्य बाजारपेठ आणि सुरक्षीत साठवणुकीचाही अभाव आहे. त्यामुळे फलोत्पादक शेतकऱ्यांची मोठी पंचाईत होते.योग्य बाजारपेठेअभावी त्यांना मिळेल त्या दरात फळे विकावी लागतात. भाजीपाला उत्पादकांनाही याच समस्येचा सामना करावा लागतो. ही समस्या लक्षात घेऊनच पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत वाशिम येथे कृषी मॉल उभारणीस २.५० कोटींच्या खर्चास मंजुरीही दिली. याच कृषी मॉलमध्ये सेंद्रीय भाजीपाला विक्रीची सुविधाही कृषी विभागाकडून करण्यात येणार आहे.या कृषी मॉलच्या उभारणीची तयारी सुरू असतानाच शासनाने कोरोना संसर्ग पृष्ठभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे विविध योजनांची कामे थांबविण्याच्या सुचना दिल्या. त्यामुळे जिल्हा कृषी विभागाने या कृषी मॉलचा आराखडा तयार केला असला तरी, त्याला मूर्त रुप मिळणे शक्य झालेले नाही.
अशी आहे प्रस्तावित कृषी मॉलची रचनाजिल्ह्यात प्रस्तावित असलेला कृषी मॉल१४ गुंठे जागेवर उभारला जाणार आहे. मध्ये दोन माळे राहणार आहेत. त्यात खालच्या माळ्यात शास्त्रोक्त पद्धतीने फळे पिकविण्यासाठी माफकदरात ५ टन क्षमतेचे रायपनिंग चेंबर, सुरक्षीत साठवणुकीसाठी ५ टन क्षमतेचे फ्री कूलिंग चेंबर, तसेच १० टन क्षमतेचे कोल्ड स्टोरेज राहणार आहे.
वरच्या माळ्यावर शेतकºयांना प्रशिक्षण देण्यासाठी एक हॉल बांधला जाणार आहे. याच माळ्यावर तात्पुरत्या स्वरुपात सेंद्रीय भाजीपाला विक्रीची सुविधाही कृषी विभागाकडून केली जाणार आहे. पुढे आवश्यकतेनुसार या कृषी मॉलचा विस्तार करून त्यात शेतकºयांसाठी आणखी काही सुविधा व स्वतंत्र सेंद्रीय भाजीपाला विक्री केंद्रही तयार करण्याचा कृषी विभागाचा मानस आहे.
पालकमंत्र्यांनी नाविण्यपूर्ण उपक्रम म्हणून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत २.५० कोटी खर्चाच्या कृषी मॉल निर्मितीस मंजुरी दिली आहे. त्यात फळप्रक्रिया युनिट, साठवणुकीसह विक्रीची सुविधाही प्रस्तावित आहे; परंतु नव्या उपक्रमांवरील खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे शासनाचे निर्देश असल्याने या मॉलची निर्मिती तूर्तास होऊ शकली नाही. शासनाकडून मंजुरी मिळताच हे काम सुरू केले जाईल.-एस. एम. तोटावार,जिल्हा अधीक्षककृषी अधिकारी, वाशिम