पावसाळा निम्मा उलटला असतानाही जिल्ह्यात सार्वत्रिक स्वरूपात आणि पाणलोट क्षेत्रात पावसाचा अभाव असल्याने १५ जुलैपर्यंतही प्रकल्पांची पातळी ३३ टक्क्यांवरच होती. त्यात ३५ पेक्षा अधिक प्रकल्पांत २५ टक्केही जलसाठा झाला नव्हता. जून महिन्याच्या अखेरपासून पावसाने खंड दिल्याने प्रकल्पांच्या पातळीत किंचितही वाढ होऊ शकली नव्हती. त्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट ओढवते की काय, अशी भीतीही वाटू लागली होती. दरम्यान, जिल्ह्यात १२ जुलैपासून पावसाने ठाणच मांडले. सतत पडत असलेल्या पावसाने पिकांचे नुकसान झाले असले तरी प्रकल्पांच्या पातळीला मोठा आधार मिळाला आणि अवघ्या १० दिवसांत प्रकल्पांची पातळी ३३ टक्क्यांवरून वाढत ५२.३१ टक्क्यांवर पोहोचली. त्यात ३ मध्यम प्रकल्पांची सरासरी पातळी ६५.६० टक्के आहे. शिवाय २६ लघू प्रकल्प शंभर टक्के भरले, तर १३ प्रकल्पात ७५ ते ९९ टक्के, २३ प्रकल्पांत ५० ते ७५ टक्के, तर ३६ प्रकल्पात २५ ते ५० टक्के जलसाठा झाला आहे.
----------
२३ प्रकल्पात ठणठणाटच
जिल्ह्यातील १३७ पैकी २६ प्रकल्प शंभर टक्के भरले, तर ५२ प्रकल्पात २५ ते ५० टक्क्यांपर्यंत जलसाठा झाला असला तरी ३८ प्रकल्पांची स्थिती गंभीर आहे. त्यात १२ प्रकल्पात २५ टक्क्यांपेक्षा कमी, ३ प्रकल्पात १० टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा आहे, तर २३ प्रकल्पांत अद्यापही ठणठणाटच आहे. त्यामुळे संबंधित भागांतील शेतकऱ्यांच्या सिंचनाची समस्या गंभीर होऊ शकते.
----------
मानोरा तालुक्याची स्थिती दमदार
जुलै महिन्याच्या मध्यंतरापासून पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली असली तरी जिल्ह्यात मानोरा तालुक्यातील प्रकल्पांची स्थिती सर्वात चांगली आहे. या तालुक्यातील १३ प्रकल्प शंभर टक्के भरले असून, तालुक्यातील २५ प्रकल्पात सरासरी ८२ टक्के जलसाठा झाला आहे. या तालुक्यातील केवळ १ प्रकल्प १० टक्क्यांच्या खाली, तर एक प्रकल्प २५ टक्क्यांच्या खाली आहे.
--------------------------
वाशिम तालुक्याची स्थिती गंभीर
जुलै महिन्याच्या मध्यंतरापासून पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली असताना वाशिम तालुक्यातील प्रकल्पांची स्थिती गंभीर आहे. या तालुक्यातील केवळ १ प्रकल्प शंभर टक्के भरला असून, तालुक्यातील १९ प्रकल्पांत मृतसाठाच आहे, तसेच २ प्रकल्पांत १० टक्क्यांपेक्षा कमी, तर ५ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा असून, या तालुक्यातील केवळ १ प्रकल्प १० टक्क्यांच्या खाली, तर एक प्रकल्प २५ टक्क्यांच्या खाली आहे. तालुक्यातील ३६ प्रकल्प मिळून केवळ १८.४३ टक्के जलसाठा झाला आहे.
लघू प्रकल्पांतील तालुकानिहाय जलसाठा
तालुका - प्रकल्प - जलसाठा (टक्के)
वाशिम - ३६ - १८.४३
मालेगाव - २३ - ६५.३९
रिसोड - १९ - ३३.१८
मं.पीर. - १५ - ६३.०६
मानोरा - २५ - ८१.८९
कारंजा - १६ - ५३.७३
--------------------------
मध्यम प्रकल्पांची पातळी
प्रकल्प - पातळी (टक्के)
एक बुर्जी - ८९.६४
सोनल - ६१.४७
अडाण - ६२.३६