वाशिम : इयत्ता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव क्रीडा गुण देण्यासाठी २१ जून या अंतिम मुदतीपर्यंत २६५ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. प्राप्त प्रस्तावांची छाननी करून विभागीय शिक्षण मंडळाकडे २५ जूनपूर्वी प्रस्ताव सादर केले जाणार आहेत.
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना विविध क्रीडा स्पर्धेतील कामगिरी पाहून सवलतीचे क्रीडा गुण दिले जातात. कोविड - १९च्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक सत्रच सुरू झालेले नसल्यामुळे खेळाडू विद्यार्थ्यांचा खेळामध्ये सहभाग होऊ शकलेला नाही. त्यामुळे सन २०२१ - २१ या वर्षात दहावी परीक्षेसाठी प्रविष्ठ विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता ८वी आणि ९वीमध्ये सदर विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेण्यात यावा व सदर विद्यार्थ्यांस सन २०२०-२१ करिता सवलतींचे क्रीडा गुण देण्यात येणार आहेत तसेच सन २०२०-२१ या वर्षात इयत्ता बारावी परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता १२वी पूर्वी इयत्ता ११वीमधील विद्यार्थ्यांचा क्रीडा सहभाग विचारात घेण्यात येणार आहे. सन २०२० - २१मध्ये इयत्ता दहावी व इयत्ता बारावीमध्ये शिकत असलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांचे अनुक्रमे इयत्ता ८वी ते ९वीमधील खेळाच्या प्राविण्य प्रमाणपत्राच्या प्रती मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्याद्वारा साक्षांकित करून प्रस्ताव दोन प्रतीत २१ जून २०२१पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वाशिम येथे मागविण्यात आले होते. अंतिम मुदतीपर्यंत जिल्ह्यातील २६५ विद्यार्थ्यांचे प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले आहेत. सवलतीच्या गुणांसाठी प्राप्त प्रस्तावांची छाननी करून २५ जूनपूर्वी विभागीय शिक्षण मंडळाकडे प्रस्ताव सादर केले जाणार आहेत, असे जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार यांनी सांगितले.
000000
दहावीतील एकूण विद्यार्थी - १९,७१५
बारावीतील एकूण विद्यार्थी - १८,१७५