लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव - केंद्र शासनाचे ह्यआवास अॅपह्ण बंद असल्याने तालुक्यातील २६७ घरकुलांचे अनुदान वाटप गत आठ दिवसांपासून रखडले आहे.प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत मालेगाव तालुक्यात ९६७ घरकुले मंजूर आहेत. या घरकुलांची बांधकामे सुरु आहेत. त्यापैकी काहींचे बांधकाम विविध टप्प्यात आले असून, बांधकामाच्या टप्प्यानुसार अनुदान मिळणे अपेक्षीत आहे. आता ह्यआवास अॅपह्ण बंद असल्याने लाभार्थीसह घरकुलाचे छायाचित्र घेऊन ते अपलोड करण्याची कार्यवाही थांबली आहे. घरकुलाचे छायाचित्र अपलोड झाल्यानंतरच अनुदान हे लाभार्थीच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी किमान २० दिवसांचा कालावधी लागतो. अॅप बंद असल्याने आता संबधित घरकुलांचे बांधकामदेखील थांबले आहे. अनुदानाअभावी लाभार्थीं त्रस्त असून, याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देणे अपेक्षीत आहे.याबाबत पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता राहूल रत्नपारखी यांच्याकडे विचारणा केली असता, ते म्हणाले की, सदर अॅप हे मागील सात ते आठ दिवसांपासून बंद आहे. याबाबत वरिष्ठांकडे तक्रार केली असता दोन दिवसांनी रिफ्रेश करून पहा, असे सांगण्यात येते. सदर अॅप सुरू झाल्याशिवाय पुढील कार्यवाही करता येत नाही, असे रत्नपारखी यांनी स्पष्ट केले.