विवेकानंद ठाकरे / रिसोड ( जि. वाशिम) : शाळांमधील बोगस विद्यार्थ्यांच्या शोध मोहिमेचा एक भाग म्हणून राज्य शासनाने प्रत्येक विद्यार्थ्याची आधारकार्डशी जोडणी सक्तीची केली आहे. चालू शैक्षणिक सत्रापासून प्रवेश प्रक्रियेदरम्यान आधारकार्ड घेण्यास प्रारंभ करण्यात आले आहे. त्यानुषंगाने रिसोड तालुक्यातील २७ हजार विद्यार्थ्यांंची आता आधारकार्डशी जोडणी होणार आहे. विद्यार्थ्यांंच्या आधारकार्डची लिंक थेट दाखल खारीज नोंद रजिस्टरमध्ये जोडली जाणार आहे. परिणामी आधारकार्ड प्रवेश घेताना क्रमप्राप्त करण्यात आले असल्याचे माहिती आहे. जिल्हय़ात त्या अनुषंगाने प्रशासनाने विद्यार्थ्यांंसाठी आधार केंद्रांतर्गत आधारकार्ड काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. शिक्षण विभागाकडे असलेल्या नोंदीनुसार २0१४-१५ मध्ये रिसोड तालुक्यातील १९६ शाळांमध्ये ४७ हजार ६९१ विद्यार्थी होते. यापैकी केवळ १६ हजार ६९२ विद्यार्थ्यांंचे आधारकार्ड काढण्यात आलेले आहे. त्यामुळे आता २६ हजार ६३८ विद्यार्थ्यांंचे आधारकार्ड काढण्याचा अजेंडा रिसोड पंचायत समितीने हाती घेतला आहे. ऑगस्ट २0१५ पर्यंंत शंभर टक्के विद्यार्थ्यांंची आधार कार्ड काढण्याचे उद्दिष्ट शिक्षण विभागासमोर आहे. त्यामुळे पंचायत समितीने १00 टक्के विद्यार्थ्यांंची आधारशी जोडणी व्हावी यासाठी नियोजन जवळपास पूर्ण केले आहे. बोगस विद्यार्थी व पटसंख्या शोधण्याच्या दृष्टीने शासनाने ही मोहीम हाती घेतली आहे. दुसरीकडे शालेय पोषण आहार पुस्तके, अनुदान, आदी वाटपामध्ये पारदर्शका निर्माण व्हावी यासाठीही मोहीम महत्त्वपूर्ण मानल्या जात आहे. आधार जोडणीमुळे शाळांमध्ये बोगस विद्यार्थी राहणार नाही.
रिसोडमधील २७ हजार विद्यार्थ्यांची होणार आधारशी जोडणी
By admin | Published: June 29, 2015 1:20 AM