- संतोष वानखडेवाशिम : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सन २०१९-२० वर्षातील अनुदानातून राज्यातील सहा जिल्ह्यातील जवळपास २८४ प्राथमिक आरोग्य केंद्रांत लवकरच ‘एक्झरसाईज सायकल’ (ट्रेडमिल) मिळणार आहेत. यासाठी ४२.६० लाखांची तरतूद असून, वाशिम जिल्ह्यातील २५ आरोग्य केंद्रांचा यामध्ये समावेश आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सन २०१९-२० वर्षातील अनुदानातून चंद्रपूर, अमरावती, उस्मानाबाद, गडचिरोली, वाशिम व नंदुरबार या जिल्ह्यातील जवळपास २८४ प्राथमिक आरोग्य केंद्रांत आवश्यक ती उपकरणे व साहित्य सामुग्रीची खरेदी ही निविदा प्रक्रियेद्वारे करण्यास सार्वजनिक आरोग्य विभागाने १६ जुलै रोजी प्रशासकीय मान्यता दिली आहे. सन २०१९-२० या आर्थिक वर्षातील मंजूर कृती आराखड्यानुसार २८४ प्राथमिक आरोग्य केंद्रात ५७.३६ लाख रुपयांतून उपकरणे व साहित्याची खरेदी केली जाणार आहे. २८४ प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘एक्झरसाईज सायकल’ खरेदीसाठी ४२ लाख ६० हजार रुपये मिळणार असून, यामध्ये वाशिम जिल्ह्यातील २५ प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी तीन लाख ७५ हजार रुपये प्रस्तावित आहेत. एका सायकलची किंमत १५ हजार रुपये गृहित धरण्यात आली आहे. याप्रमाणेच २८४ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेब्यूलायझर खरेदीसाठी ७ लाख ३८ हजार ४०० रुपयांची तरतूद आहे. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील २५ आरोग्य केंद्रांसाठी ६५ हजार रुपयाचा समावेश आहे. तसेच २८४ प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘इन्फ्रॉरेड दिव्या’साठी ७ लाख ३८ हजार ४०० रुपये मिळणार असून यामध्ये वाशिम जिल्ह्यातील २५ प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ६५ हजार रुपयाची तरतूद आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनात वाशिम जिल्ह्यात या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
२८४ प्राथमिक आरोग्य केंद्रांना मिळणार ‘एक्झरसाईज सायकल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 3:02 PM
राज्यातील सहा जिल्ह्यातील जवळपास २८४ प्राथमिक आरोग्य केंद्रांत लवकरच ‘एक्झरसाईज सायकल’ (ट्रेडमिल) मिळणार आहेत.
ठळक मुद्देवाशिम जिल्ह्यातील २५ आरोग्य केंद्रांचा यामध्ये समावेश आहे. ‘एक्झरसाईज सायकल’ खरेदीसाठी ४२ लाख ६० हजार रुपये मिळणार आहेत. वाशिम जिल्ह्यातील २५ प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी तीन लाख ७५ हजार रुपये प्रस्तावित आहेत.