लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कृषी विभागाने वाशिम जिल्ह्यात बोंडअळीग्रस्त क्षेत्रांचे सर्वेक्षण पूर्ण केले असून, जवळपास ३० हजार हेक्टरवरील कपाशीला बोंडअळीचा फटका बसल्याचे सर्वेक्षणाअंती समोर आले. यावर्षी शेतक-यांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. यावर्षी बोंडअळीने हल्ला चढवून कापूस उत्पादक शेतक-यांच्या नाकीनऊ आणले. बोंडअळीग्रस्त भागाचे पंचनामे (सर्वेक्षण) करण्याचे आदेश शासनाने कृषी विभागाला दिले होते. त्या अनुषंगाने जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने आता सर्वेक्षण पूर्ण केले. वाशिम जिल्ह्यात ३० हजार ९२१ हेक्टरवर ११९३७ शेतकºयांनी कपाशीची लागवड केली होती. सुरुवातीला अपु-या पावसामुळे अडचणीत आलेल्या कपाशीच्या पिकाला परतीच्या पावसाने चांगलाच आधार दिला; परंतु ही कपाशी वेचणीवर येत असतानाच त्यावर बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव झाला. बोंडअळीग्रस्त क्षेत्राचा सर्व्हे करण्याचे आदेश कृषी विभागाला प्राप्त झाल्यानंतर, शेतकºयांसह गावांतील पंचांना घेऊन तलाठी आणि कृषी सहाय्यक, कृषी विभागाच्या कर्मचा-यांनी कपाशीच्या शेतात भेटी देऊन पंचनामे केले. मानोरा तालुक्यात १३ हजार ३०१ हेक्टर क्षेत्राचे सर्वेक्षण केले असता जिरायती भागातील १०२३ हेक्टर, तर बागायती भागातील १२२७८ हेक्टर क्षेत्रातील कपाशीचे बोंडअळीमुळे ३३ टक्क्याहून अधिक नुकसान झाल्याचे आढळले. मंगरुळपीर तालुक्यात १८७६ हेक्टरपैकी संपूर्ण क्षेत्र जिरायतीच असून, या सर्व क्षेत्रातील कपाशीला बोंडअळीचा फटका बसला, त्याशिवाय रिसोड तालुक्यात ५२३ हेक्टर जिरायती आणि वाशिम तालुक्यातील ६५२ हेक्टर क्षेत्रातील जिरायती भागातील कपाशीला बोंडअळीचा फटका बसला. मालेगाव तालुक्यात पेरणी केलेल्या १६५८.९ हेक्टर क्षेत्रापैकी जिरायती भागातील ९८.३३, तर बागायती क्षेत्रातील १५६०.६ हेक्टर क्षेत्रातील कपाशीला बोंडअळीचा फ टका बसला. कारंजा तालुक्यात सर्वाधिक १५६८२ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी करण्यात आली असून, यापैकी जिरायती भागातील ७५२३.६१ हेक्टर कपाशीला बोंडअळीचा फटका बसला, असे सर्वेक्षणाअंती स्पष्ट झाले. सर्वेक्षणाचा हा अहवाल येत्या सोमवार किंवा मंगळवारी शासनाकडे पाठविला जाईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील गुण नियंत्रण अधिकारी डी.आर. साठे यांनी सांगितले.
वाशिम जिल्ह्यात कपाशीचे ३० हजार हेक्टर क्षेत्र बोंडअळीने बाधित !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 7:19 PM
वाशिम : कृषी विभागाने वाशिम जिल्ह्यात बोंडअळीग्रस्त क्षेत्रांचे सर्वेक्षण पूर्ण केले असून, जवळपास ३० हजार हेक्टरवरील कपाशीला बोंडअळीचा फटका बसल्याचे सर्वेक्षणाअंती समोर आले.
ठळक मुद्देकृषी विभागाचे सर्वेक्षण पूर्ण ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान