वाशिम : शेतकऱ्याच्या विहिरीचे मोजमाप करून मस्टर मंजुरीसाठी ३० हजाराच्या मागणीपैकी पहिल्या टप्प्यात ५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वाशिम पंचायत समितीमधील तांत्रिक अधिकारी (पीटीओ) विजय राऊत याला ८ जूनला अटक केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक गजानन शेळके यांच्या पथकाने ही कारवाई केली.
प्राप्त माहितीनुसार आरोपी विजय राऊत याने तक्रारदाराला त्यांच्या वडिलांच्या नावाने रोजगार हमी योजना अंतर्गत सन २०२२-२३ मध्ये मंजूर झालेल्या विहिरीचे पूर्ण शेवटपर्यंत अनुदान देण्यासाठी ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर विहीर खोदकामाचे पहिल्या टप्प्याचे अनुदान तक्रारदाराच्या वडिलांच्या खात्यात जमा करण्यासाठी तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून स्वीकारण्याची तयारी दर्शविली. यावरून ८ जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. या कारवाईदरम्यान आरोपी लोकसेवकाला संशय आल्याने त्यांनी तक्रारदाराकडून लाच रक्कम स्वीकारली नाही. यावरून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. वृत्त लिहिस्ताेवर वाशिम शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती.