वाशिम, दि. ५- वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली रविवार, ५ मार्च रोजी नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या राज्यस्तरीय जिल्हा वार्षिक योजना बैठकीत सन २0१७-१८ करिता वाशिम जिल्हा विकासासाठी ३0२ कोटी २८ लाख ८२ हजार रुपयांची अतिरिक्त मागणी सादर करण्यात आली. याबाबत सकारात्मक विचार करून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. याप्रसंगी वित्त व नियोजन विभागाचे राज्यमंत्री दीपक केसरकर, वाशिमचे सहपालकमंत्री मदन येरावार, आमदार राजेंद्र पाटणी, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त माया केदार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. बी. पटेल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक के. एम. अहमद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. आर. गाडेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी सांगितले, की जिल्हा वार्षिक योजना २0१७-१८ अंतर्गत वाशिम जिल्ह्यासाठी ८९ कोटी ३0 लाख रुपये नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र, विविध यंत्रणांकडून ३९१ कोटी ५८ लाख ८२ हजार रुपयांची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा वार्षिक योजना २0१७-१८ अंतर्गत ३0२ कोटी २८ लाख ८२ हजार रुपयांची अतिरिक्त मागणी सादर करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले. जिल्ह्याच्या विकासासाठी अतिरिक्त निधी मंजूर करण्यात यावा. तसेच घोषित करण्यात आलेले वैद्यकीय दंत महाविद्यालय लवकरात लवकर मंजूर करण्यात यावे, अशी मागणी आमदार पाटणी यांनी यावेळी केली.
जिल्हा विकासासाठी ३0२ कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी
By admin | Published: March 06, 2017 2:31 AM