वाशिम : लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने पैशांची अवैधरित्या होणारी वाहतूक रोखण्यासाठी विविध ठिकाणी चेकपोस्ट उभारून वाहनांची झाडाझडती घेतली जात आहे. दरम्यान, ५ एप्रिल रोजी सकाळी ८.१५ वाजताच्या सुमारास अशाच एका वाहनाची झडती घेवून बोरगाव (ता.करमाळा जि.सोलापूर) येथील एका व्यक्तीकडून ३ लाख १० हजारांची रक्कम जप्त करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिक्षण विभागात कार्यरत कर्मचारी तथा पथक प्रमुख शैलेश डोळस यांच्यासह पथकातील अन्य कर्मचाऱ्यांकडून अनसिंग गावानजिकच्या पन्हाळा चेक पोस्टवर सकाळच्या सुमारास रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांची झाडाझडती घेणे सुरू होते. यादरम्यान त्याठिकाणी आलेल्या निलेश मारूती शिंदे यांच्या वाहनात ३ लाख १० हजारांची रक्कम ठेवून असल्याचे आढळून आले. सदर रक्कम पथकाकडून तात्काळ जप्त करण्यात आली.
पन्हाळा चेक पोस्टवर कार्यरत पथकाने निलेश शिंदे नामक व्यक्तीकडून ३ लाख १० हजार रुपयांची रक्कम जप्त केली आहे. संबंधित व्यक्ती पैशासंबंधीचा योग्य पुरावा सादर करून शकला नाही. समाधानकारक पुरावा आणून दिल्यास रक्कम परत करण्याची तरतूद आहे.- राजेंद्र जाधव, एसडीओ तथा सहा. निवडणूक अधिकारी, मंगरूळपीर