ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि.७ - ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर कायमस्वरुपी उपाययोजना म्हणून राबविण्यात येणा-या ‘मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम’ या महत्वाकांक्षी योजनेच्या पहिल्या टप्प्यात मे २०१६ मध्ये वाशिम जिल्ह्यातील २५ गावांचा समावेश झाला आहे. यासाठी तब्बल ३२ कोटी ५३ लाख १७ हजार रुपयांची तरतूदही करण्यात आली. मात्र, अद्यापही या योजनांचे काम सुरू होऊ शकले नाही.
ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या मागणी आधारीत धोरणांतर्गत अनेक पाणीपुरवठा योजना राबविण्यात आलेल्या आहेत. या व्यतिरिक्त विविध योजनांच्या माध्यमातून नळपाणी पुरवठा योजना, विंधन विहीरीवरील योजना या सारख्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. आता राष्टÑीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या धर्तीवर राज्यात सन २०१६-१७ ते २०१९-२० या चार वर्षासाठी ‘मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे.
या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात समाविष्ठ केलेल्या गावांची नावे राज्य शासनाने ७ मे २०१६ रोजी जाहिर केली होती. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील २५ गावांचा समावेश असून तब्बल ३२.५३ कोटींची तरतूद केली आहे. मात्र, तांत्रिक बाबींमध्ये अडकलेल्या या योजनेच्या कामांना अद्यापही सुरूवात होऊ शकली नाही. तांत्रिक बाबींची पुर्तता झाल्यानंतर कामांना सुरूवात होईल, असे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता नीलेश राठोड यांनी सांगितले.
वाशिम तालुक्यातील आठ योजनांसाठी १४ कोटी ६१ लाख ४० हजार रुपये, मंगरुळपीर तालुक्यात सहा योजनांसाठी पाच कोटी ९३ लाख रुपये, रिसोड चार योजनांसाठी चार कोटी ४९ लाख १७ हजार रुपये, मालेगाव तीन योजनांसाठी तीन कोटी ७१ लाख रुपये, कारंजा तीन योजनांसाठी दोन कोटी ९३ लाख रुपये तर मानोरा तालुक्यातील एका योजनेसाठी ८५ लाख ६० रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.