सुनील काकडे । लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हयातील ५४ गावांना छेदून जाणाऱ्या नागपूर-मुंबई या एकूण ७०६ किलोमिटर अंतराच्या ‘सुपर कम्युनिकेशन-वे’संदर्भातील ड्रोनव्दारे सर्वेक्षण, संयुक्त मोजणी आणि पिल्लर फिक्सींगची कामे पूर्ण झाली असून लवकरच सरळ खरेदी पद्धतीने भूसंपादन प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यानुषंगाने ‘रेडी रेकनर’नुसार ५४ पैकी ३४ गावांचे भूसंपादन दर देखील निश्चित झाले आहेत. वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गाचे अंतर ९७ किलोमिटर असून चार तालुक्यांमधील ५४ गावांना छेदून जात असलेल्या या महामार्गासाठी मालेगाव २२, कारंजा लाड २१, मंगरूळपीर १० आणि रिसोड तालुक्यात एका गावामधील एकूण १५०० हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. याशिवाय तीन ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या कृषी समृद्धी केंद्रांसाठी प्रत्येकी ४०० हेक्टर याप्रमाणे १२०० हेक्टर जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सद्या सुरू आहे. दरम्यान, सरळ खरेदी पद्धतीने राबविल्या जाणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेसंदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या असून ‘रेडी रेकनर’नुसार जमिनीचे दर निश्चित करण्यात आले आहेत. प्राप्त माहितीनुसार, पेडगांव, पांगरी, तपोवन, शेंदूरजना मोरे, मजलापूर, वनोजा, भूर, येडशी, जनुना खुर्द यासह इतर गावांमधील जिरायती शेतीसाठी ५ लाख रुपये ते ८.२५ लाख रुपये प्रतिहेक्टरचे दर निश्चित झाले असून संबंधित शेतकऱ्यांकडून रितसर संमतीपत्र भरून घेण्याची प्रक्रिया सद्या सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे क्षेत्रीय अधिकारी सुनील माळी यांनी ‘लोकमत’ला दिली.
भूसंपादनाकरिता ३४ गावांचे दर ‘फायनल’!
By admin | Published: June 13, 2017 1:41 AM