सुनील काकडे
वाशिम : एनसीआरबी (नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरो)चा २०२०चा अहवाल जाहीर झाला आहे. त्यात देशभरातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत वाशिम जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण कमी दिसत असल्याचे समाधान असले तरी २०२० मध्ये जिल्ह्यात ३५ खून, २४ बलात्कार आणि ६६ अपहरणाच्या घटना घडल्या आहेत. २०१९ च्या तुलनेत हे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे.
.................
अहवालानंतरची आकडेवारी सांगतेय २०२०/२०२१
खून - ३१/३५
बलात्कार - १०/२४
अपहरण - ५८/६६
.............
तीन घटनांनी हादरला होता जिल्हा
घटना क्रमांक १
इयत्ता नवव्या वर्गात शिकणारी वैष्णवी जाधव (वाशिम) ही मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पालकांनी २० जानेवारी २०२० रोजी पोलिसात दाखल केली. पोलिसांनी कसून तपास केला; मात्र वैष्णवीचा काहीच सुगावा लागला नाही. काही संघटनांनी आक्रमक होत पोलिसांविरोधात रोष व्यक्त करत मोर्चाही काढला होता. तब्बल ९ महिन्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. जवळच्या नातेवाइकांनीच पैशांसाठी वैष्णवीची निघृण हत्या केल्याचे निष्पन्न झाले.
.............
घटना क्रमांक २
वाशिम शहरातील भवानी नगर परिसरात राहणाऱ्या अ. वसीम अ. वजीद या २४ वर्षीय युवकाची २१ डिसेंबर २०२० रोजी दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. शिवाजी चौक परिसरातील सॉ मिल मागे असलेल्या मोबाइल टॉवरनजीक बाभळीच्या झाडाखाली त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल केला. या घटनेचा उलगडा व्हायलाही चांगलाच विलंब लागला होता.
................
घटना क्रमांक ३
नागरतास (ता.मालेगाव) येथे जुन्या वादातून विजय केशवराव देवळे (४५) यास पाईप व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याची हत्या केल्याची घटना २७ ऑगस्ट २०२० रोजी घडली. याप्रकरणी मृतकाची पत्नी रेखा देवळे यांनी फिर्यादीत नमूद केले होते की, तिचे पती विजय आणि आरोपी विष्णू देवळे यांच्यात १७ वर्षांपूर्वी वाद झाला होता. २७ ऑगस्टला रात्री विजय भाजी आणण्यासाठी वडिलांच्या घरी गेला असता सहा जणांनी त्यास जबर मारहाण केली. यामुळे विजयचा मृत्यू झाला.