लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : येथील प्रगतशील कास्तकार गणेश इरतकर यांनी आपल्या अवघ्या एक एकर शेतात सिमला मिरचीचे ३५० क्विंटल उत्पन्न घेण्याची किमया साध्य केली. त्यांच्या या प्रयोगशिलतेचे परिसरातील शेतकऱ्यांमधून कौतुक होत आहे.शिरपूर येथील उच्चशिक्षित असलेले गणेश इरतकर हे कृषी व्यवसायीक असण्यासोबतच प्रगतीशिल कास्तकार म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांनी यापुर्वी द्राक्षाची शेती देखील यशस्वी करून दाखविली असून त्यातूनही विक्रमी उत्पन्न घेतले आहे. दरम्यान, त्यांनी नोव्हेंबर २०१९ या महिन्यात आपल्या एक एकर शेतात सिमला मिरचीची लागवड केली. आता सिमला मिरचीची दैनंदिन तोड सुरू असून प्रत्येक झाडाला मोठ्या प्रमाणात सिमला मिरच्या लदबदल्या आहेत. त्यापासून दैनंदिन उत्पन्न देखील निघत असल्याचे त्यांनी सांगितले. ते सिमला मिरचीची वाशिम येथील बाजारपेठेत विक्री करित आहेत. प्रति किलो २० ते ३० रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. सिमला मिरचीच्या शेतीला आतापर्यंत ४० हजार रुपये खर्च आला आहे.एका एकरात सिमला मिरचीपासून साधारणत: ३०० ते ३५० क्विंटल उत्पन्न होण्याची आशा शेतकरी गणेश इरतकर यांनी व्यक्त केली. ते शेतीमध्ये नियमित नवनवीन प्रयोग करतात आणि त्यात यशस्वी देखील ठरतात. त्यांच्या याच प्रयोगशिलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.(वार्ताहर)
एक एकरात सिमला मिरचीचे ३५० क्विंटल उत्पादन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 3:01 PM