लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : कोरोनामुळे तब्बल १० महिन्यांनंतर सोमवार, २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होणार आहेत. तत्पूर्वी जिल्ह्यातील ३,५४० शिक्षकांची कोरोना चाचणी केली जात असून, आतापर्यंत जवळपास १,५४० जणांची चाचणी झाली.कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावाचा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. यामधून शिक्षण क्षेत्रही सुटू शकले नाही. गत तीन महिन्यांपासून कोरोनाचा आलेख खाली येत आहे. २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू झालेले आहेत. आता कोरोनाचा आलेख आणखी खाली येत असल्याचे पाहून २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पाचवी ते आठवीच्या शिक्षकांची कोरोना चाचणी केली जात आहे. जिल्ह्यात जवळपास ३,५४० शिक्षक असून, आतापर्यंत १,५४० शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. चाचण्या कोठे, किती?
- तालुकानिहाय शिक्षकांच्या कोरोना चाचणीची सोय कोविड केअर सेंटरमध्ये उपलब्ध केली आहे.
- दैनंदिन सरासरी ४० ते ५० शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे.
- शक्य तेवढ्या लवकर चाचणी करण्याच्या सूचना शिक्षकांना देण्यात आल्या आहेत.
इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होणार असल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून शिक्षकांची कोरोना चाचणी केली जात आहे. अशा सूचनाही गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. सरकारी कोविड केअर सेंटर येथे कोरोना चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. शाळा सुरू करण्याबाबत आढावा घेतला जात आहे.- गजानन डाबेराव, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) वाशिम