वाशिम : शासनाने प्रतिबंधीत केलेल्या विविध कंपन्याच्या गुटख्याची शहर व परिसरात खुलेआम विक्री सुरु आहे. अनेक ठिकाणी गुटख्याचे साठे आढळून येत आहेत. वाशिम शहरात दोन ठिकाणी गुटख्याच्या साठ्यावर स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलीस स्टेशनच्या शोध पथकाने रविवार व सोमवारी छापे टाकून ३.५७ लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला . याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे.वाशिम शहरातील सिंधी कॅम्प परिसरात एका ठिकाणी गुटख्याची साठवणूक असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक शिवा ठाकरे यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर सहाय्यक पोलीस निरिक्षक अजय वाढवे, पोलीस उपनिरिक्षक कैलास इंगळे, हवालदार भगवान गावंडे, पोलीस शिपाई किशोर खंडारे, प्रेम राठोड, अश्विन जाधव, बालाजी बर्वे यांचा समावेश असलेल्या पथकाने संशयीत ठिकाणी छापा टाकला. या छाप्यामध्ये एलसीबीच्या पथकाला २ लाख ३२ हजार रूपये किंमतीचा गुटखा आढळून आला. यामध्ये गाजी, वंश, विमल व नजर अशा विविध उत्पादन कंपण्याचा गुटखा होता. याप्रकरणी पोलीसांनी गुटखा साठेबाज गोपाल मनोज अग्रवाल (वय २०, रा. सनसिटी, वाशिम) याला ताब्यात घेतले आहे.दुसऱ्या एका घटनेत वाशिम शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हरिष गवळी यांच्या अधिपत्याखाली असलेल्या शोध शाखेतील पोलीस उपनिरिक्षक अमित जाधव, पोलीस नाईक शिपाई प्रशांत अंभोरे, ज्ञानदेव म्हात्रे, गणेश बर्वे, दिलीप लेकुळे, स्वप्नील तुळजापुरे, सिरसाट व महिला पोलीस शिपाई काळमुंदळे यांचा समावेश असलेल्या पथकाने गणेश पेठ परिसरात एका घरामध्ये छापा टाकला. या छाप्यामध्ये पोलीसांना १.२६ लाख रूपये किंमतीचा गुटखा आढळून आला. यामध्ये विमल, नजर, गांझी व पान बहार सुगंधीत सुपारी आढळून आली. याप्रकरणी पोलीसांनी गोवर्धन गिरधरलाल नथवाणी याला ताब्यात घेतले. उपरोक्त दोन्ही कारवाईची माहिती पोलीस विभागाने अन्न व औषध प्रशासनाला दिली असून यापुढील रितसर कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी करणार आहेत.
वाशिम शहरात ३.५७ लाखाचा गुटखा जप्त; एलसीबी व डीबी पथकाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 5:37 PM
वाशिम शहरात दोन ठिकाणी गुटख्याच्या साठ्यावर स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलीस स्टेशनच्या शोध पथकाने रविवार व सोमवारी छापे टाकून ३.५७ लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला .
ठळक मुद्दे सिंधी कॅम्प परिसरात एका ठिकाणी गुटख्याची साठवणूक असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक शिवा ठाकरे यांना मिळाली. या छाप्यामध्ये एलसीबीच्या पथकाला २ लाख ३२ हजार रूपये किंमतीचा गुटखा आढळून आला. गणेश पेठ परिसरात एका घरामध्ये छापा टाकला. या छाप्यामध्ये पोलीसांना १.२६ लाख रूपये किंमतीचा गुटखा आढळून आला.