लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शेतकर्यांना हवामानाचा अंदाज कळावा आणि त्यादृष्टीने नियोजन करून नुकसान टाळता यावे, या उद्देशाने वर्षभरापूर्वी वाशिम जिल्ह्यात ३६ स्वयंचलित हवामान केंद्र कार्यान्वित करण्यात आलीत; परंतु त्याचा काहीच फायदा शेतकर्यांना अद्याप झालेला नाही. या हवामान केंद्रांच्या स्थापनेची जबाबदारी सोपविलेल्या स्कायमेट कंपनीच्यावतीने हवामान केंद्रांची माहिती संकलित करून प्रत्येक जिल्ह्यात पाठविण्यासाठी पुणे येथे एक पोर्टल तयार करण्यात येत आहे. या पोर्टलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या काही दिवसांत करण्यात येणार असल्याची माहिती गुरुवारी संबंधितांनी दिली.शेतकर्यांना हवामानाचा अंदाज येऊन पीक नियोजन करता यावे, यासाठी राज्य शासनाने राज्यभरात दोन हजार स्वयंचलित हवामान केंद्रे स्थापन करण्याचे ठरविले होते. त्यानंतर कृषी विभागाच्या समन्वयातून या स्वयंचलित हवामान केंद्रांसाठी जागांची निवड करून स्कायमेट कंपनीच्यावतीने ही स्वयंचलित हवामान केंद्र राज्यभरात महसूल मंडळनिहाय बसविण्यात आली. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील ४६ महसूल मंडळांचाही समावेश आहे. ही स्वयंचलित हवामान केंद्र स्थापित करण्यात आली असली, तरी शेतकर्यांना मात्र त्यामधून माहिती मिळण्यास सुरुवात झाली नाही. त्यामुळे त्यांना यंदाच्या रब्बी हंगामात हवामानाचा अंदाज कळू शकला नाही. आता या हवामान केंद्रात संकलित होणारी हवामानाची माहिती शेतकर्यांना देण्यासाठी स्कायमेट कंपनीच्यावतीने एक पोर्टल तयार करण्यात आले आहे. या पोर्टलद्वारे राज्यभरातील स्वयंचलित हवामान केंद्रांत संकलित माहिती जिल्हा स्तरावर पाठविण्यात येणार आहे. या पोर्टलचे उद्घाटन येत्या १५ जानेवारीच्या आत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित अधिकार्यांनी दिली.
वाशिम जिल्ह्यात स्थापित करण्यात आलेली स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वित झाले. या केंद्रांतून शेतकर्यांना माहिती देण्यासाठी पुणे येथे सर्व्हर बसविण्यात आले. या सर्व्हरचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाल्यानंतर तालुका स्तरावर या केंद्रांद्वारे माहिती मिळू शकणार आहे. -भूषण रिंके,जिल्हा समन्वयक, क्लायमेट वेदर सर्व्हिस.