लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील प्रती ग्राम पंचायतला ७५० याप्रमाणे एकूण ४९१ ग्रामपंचायतींना तीन लाख ६८ हजार २५० रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेने दिले आहे.५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत १ ते ७ जुलै २०१७ या कालावधीत वृक्ष लागवड केली जाणार आहे. अन्य विभागांप्रमाणेच ग्राम पंचायतींनादेखील वृक्षारोपणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागातर्फे प्रत्येक ग्राम पंचायतने किमान ७५० रोपांची लागवड करावी, असे उद्दिष्ट दिले आहे. जिल्ह्यात ४९१ ग्रामपंचायती असून, एकूण उद्दिष्ट तीन लाख ६८ हजार २५० आहे. सर्वाधिक ग्राम पंचायती कारंजा तालुक्यात असून, या तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतींना ६८ हजार २५० रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्या खालोखाल वाशिम तालुक्यातील ८४ ग्राम पंचायतींना ६३ हजार रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. मालेगाव तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतींना ६२ हजार २५०, रिसोड तालुक्यातील ८० ग्राम पंचायतींना ६० हजार, मानोरा तालुक्यातील ७७ ग्रामपंचायतींना ५७ हजार ७५० आणि मंगरूळपीर तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतींना ५७ हजार रोपांची लागवड करावी लागणार आहे. १ ते ७ जुलै दरम्यान वृक्ष लागवड केली जाणार असल्याचे आतापासूनच वृक्षारोपणासाठी खड्डे खोदण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी गटविकास अधिकाऱ्यांमार्फत ग्राम पंचायत प्रशासनाला केल्या आहेत. या सुचनांच्या अनुषंगाने ग्रामपंचायत प्रशासन कामाला लागले असल्याचे दिसून येते.‘नरेगा’ पथकाची पाहणीजिल्हा परिषदेने ग्रामपंचायतींना वृक्षारोपणाचे उद्दिष्ट दिल्यानंतर वृक्षारोपणासाठी खड्डे खोदण्याच्या सूचना केल्या आहेत. आतापासूनच खड्डे खोदणे सुरू झाले की नाही यावर देखरेख म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कक्षाचे गटविकास अधिकारी रुपेश निमके यांच्या नेतृत्वात पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकावर पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे यांचे नियंत्रण राहणार आहे. या पथकातर्फे ग्रामपंचायतींना अचानक भेटी दिल्या जात आहेत.यावर्षी प्रथमच ग्रामपंचायतींना वृक्षारोपणाचे उद्दिष्ट दिले आहे. ग्रामपंचायतींच्या ताब्यात असलेल्या जागेवर वृक्षारोपण करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. प्रती ग्रामपंचायत ७५० असे उद्दिष्ट असून, तालुकानिहाय उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. उद्दिष्टपूर्तीसाठी आतापासून ग्रामपंचायतींनी कामाला सुरूवात करावी, अशा सूचना केल्या आहेत. याची अंमलबजावणी सुरू झाली.- गणेश पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम.