लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मोडकळीस आलेल्या व नादुरुस्त असलेल्या गाव तलाव, पाझर तलाव तसेच कोल्हापुरी बंधाऱ्यांचे पुनरुज्जीवन केल्यास शेती व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल, ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे वेळोवेळी निधीची मागणी केली होती. ही बाब लक्षात घेऊन शासनाकडून अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांतील २१७ योजनांकरिता ५३.३६ कोटींचा निधी मंजूर केला आहे. विशेष बाब म्हणजे या पाचही जिल्ह्यांत एकट्या वाशिम जिल्ह्यासाठी चंद्रकांत ठाकरे यांच्या मंत्रालयीन स्तरावरील स्नेहामुळे एकट्या वाशिम जिल्ह्यासाठी ३६.९२ कोटींचा भरीव निधी मंजूर झाल्याची ही पहिलीच घटना आहे. जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय शेती व शेतीशी निगडित व्यवसाय आहे, परंतु जिल्ह्यातील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. अद्यापही जिल्ह्यात सिंचनाच्या उत्तम सोयी-सुविधा उपलब्घ नसल्याने शेती तोट्याची होत चालली आहे. परिणामी अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत. आजही शासन दरबारी मागास जिल्हा म्हणून वाशिम जिल्हा ओळखला जातो. जिल्ह्याचा मागासलेपणाचा डाग पुसण्यासाठी व जिल्ह्याला सुजलाम सुफलाम बनविण्यासाठी जास्तीत जास्त शेती सिंचनाखाली आणण्याची नितांत गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांनी आपल्या संकल्पनेतून जिल्ह्यात सिंचनाची भरीव कामे केलीत. परंतु आजही सिंचन क्षेत्रात विविध विकासकामे करण्याची गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी जिल्ह्यातील सिंचन क्षेत्राचा विकास करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरूच आहे. सद्य:स्थितीत जे प्रकल्प नादुरुस्त आहेत, मोडकळीस आलेले आहेत, पाण्याचा साठा कमी व गाळाचे प्रमाण अधिक आहे, अशा प्रकल्पांची माहिती घेऊन अशा प्रकल्पांचे पुनरुज्जीवन करून जिल्ह्यात सिंचन क्षमता वाढविण्यास नक्कीच मदत होईल, ही बाब लक्षात घेऊन सिंचन प्रकल्पांच्या विकासाकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजितदादा पवार, जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या मागणीची दखल घेत शासनाने तातडीने २० जानेवारी २०२० रोजी शासन निर्णय काढून जिल्ह्यातील लघू व मध्यम प्रकल्पासह सिंचन क्षेत्राच्या विकासाकरिता ३६.९२ कोटींचा भरीव निधी मंजूर केला आहे. प्रथमच जिल्ह्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी मिळाल्याची ही चांगली घटना आहे.(प्रतिनिधी)
वाशिम जिल्ह्यातील सिंचन विकासाकरिता ३६.९२ कोटींचा निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 12:21 PM