जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कालावधी संपुष्टात आल्याने वाशिम तालुक्यातील २४, रिसोड ३४, मालेगाव ३०, मंगरूळपीर २५, कारंजा २८ आणि मानोरा तालुक्यातील २२ अशा एकूण १६३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान तर १८ जानेवारी राेजी मतमोजणी होत आहे. २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत ४२४२ उमेदवारांनी ४३९० अर्ज दाखल केले होते. छाननीत ८९ उमेदवारांचे १३४ अर्ज बाद झाल्याने ४१५३ उमेदवारांचे ४२५६ अर्ज कायम राहिले. ४ जानेवारी राेजी दुपारी ३.३० वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम वेळ होती. या मुदतीत जिल्ह्यातील ५१० जणांनी अर्ज मागे घेतल्याने आता निवडणूक रिंगणात ३७२० उमेदवार आहेत. काही ठिकाणी थेट लढती तर काही ठिकाणी तिरंगी लढती होण्याचे संकेत असून, ग्रामीण भागात राजकारण ढवळून निघत आहे.
००००
मोप, तोंडगाव, मुरबी येथे जेवढ्या जागा; तेवढेच अर्ज
जिल्ह्यातील मोप, तोंडगाव, मुरबी आदी ग्रामपंचायतींमध्ये जेवढ्या जागा आहेत, तेवढेच उमेदवारी अर्ज आहेत, अन्य उमेदवारांनी माघार घेतल्याने येथे मतदान होण्याची शक्यता मावळली आहे. दरम्यान, रिठद, वाकद, चिखली, अनसिंग, काटा, इंझोरी, किन्हीराजा, कामरगाव आदी ठिकाणी लढती अटीतटीची होण्याचे संकेत आहेत.
०००
शिरपूर, शेलुबाजार ग्रा.पं.कडे लागले जिल्ह्याचे लक्ष
१७ सदस्यसंख्या असलेल्या शिरपूर येथील लढती अटीतटीच्या होण्याची दाट शक्यता आहे. येथे जि.प. उपाध्यक्ष डाॅ. शाम गाभणे व विरोधी गटात थेट लढत आहे. आमदार अमित झनक यांच्या मांगूळझनक गावातील लढतीकडेही लक्ष लागून आहे. शेलुबाजार ग्रामपंचायत निवडणूकही प्रतिष्ठेची ठरत आहे.
००००
५० टक्के आरक्षणामुळे महिला उमेदवारांची संख्या वाढली
ग्रामपंचायत निवडणुकीत महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव आहेत, त्यामुळे या निवडणुकीत महिला उमेदवारांची संख्यादेखील १८६० च्या आसपास आहे. ५० टक्के आरक्षणामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत महिलांचा सहभाग वाढल्याचे उमेदवारी अर्जांवरून दिसून येते.
०००
जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. एकूण ५५० प्रभाग असून, १४८७ जागा आहेत. निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.
- सुनील विंचनकर,
जिल्हा निवडणूक अधिकारी, वाशिम