- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरणावर सर्वाधिक भर दिला जात असताना, प्रशासकीय यंत्रणेतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अद्याप लसीचा एकही डोस घेतला नसल्याची माहिती समोर येत आहे. ७३ हेल्थ केअर वर्कर्स आणि ३०० फ्रंटलाइन वर्कर्स अशा एकूण ३७३ जणांनी लसीचा पहिला तर ९५०६ जणांनी दुसरा डोस घेतला नाही.देशात मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. पहिल्या लाटेत जिल्ह्यात जुलै व सप्टेंबर या दोन महिन्यांत कोरोनाबाधितांची संख्या वाढली होती. एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत एकूण ७,१४३ जणांना तर दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी ते मे २०२१ या कालावधीत ३२ हजार जणांना कोरोना संसर्ग झाला. कोरोनावर एकमेव व प्रभावी उपाय म्हणून लसीकरणावरही भर देण्यात आला. जिल्ह्यात १६ जानेवारीपासून हेल्थ केअर वर्कर्स, १२ फेब्रुवारीपासून फ्रंटलाइन वर्कर्स यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात झाली. ८,३४३ हेल्थ केअर वर्कर्सने लसीकरणासाठी नोंदणी केली असून, यापैकी ७३ जणांनी पहिला तर २,६३२ जणांनी ११ जुलैपर्यंत दुसरा डोस घेतला नाही. १६ हजार १५२ फ्रंटलाइन वर्कर्सची नोंदणी झाली असून, यापैकी ३०० जणांनी पहिला तर ६,८७४ जणांनी दुसरा डोस घेतला नाही.
कोरोनावर प्रभावी व एकमेव उपाय म्हणून लसीकरणावर भर देण्यात येत आहे. सर्वांनी कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. ज्या हेल्थ केअर, फ्रंटलाइन वर्कर्सनी पहिला व दुसरा डोस घेतला नाही, त्यांनी शक्य तेवढ्या लवकर लसीचा डोस घ्यावा.- डॉ. मधुकर राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम