संतोष वानखडे / वाशिम
स्वच्छ व सुंदर गाव ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याची जबाबदारी शिरावर घेऊन काम करणार्या निर्मल भारत अभियानाला २0१३-१४ मध्ये राज्यभरातील सहा लाख ८४ हजार ५५९ शौचालय बांधणीच्या उद्दिष्टापैकी, दोन लाख ६७ हजार ४२४ शौचालयांची बांधणी झाली आहे. एकूण उद्दीष्टाच्या ३९.0५ टक्के काम पूर्ण झाले आहे. गोदरीमुक्त गावासाठी राज्यात संपूर्ण स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले. या अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करणे अपेक्षीत आहे. याकामी ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासनाचे सहकार्य अपेक्षित आहे. संपूर्ण स्वच्छता अभियान योजनेला एप्रिल २0१२ पासून निर्मल भारत अभियान संबोधले जात आहे. या योजनेंतर्गत स्वतंत्र कौटुंबिक शौचालये बांधकामाकरिता दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबांना प्रोत्साहनपर मदत दिली जाते. आता दारिद्रय़ रेषेवरील अनुसुचित जाती, जमातीमधील कुटुंबे, अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी, घर असलेले भूमिहीन मजूर, नि:शक्त व्यक्ती, महिला कुटुंब प्रमुख असलेल्या कुटुंबांसाठी ही योजना लागू केली आहे. २0१२-१३ या वर्षात निर्मल भारत अभियानांतर्गत दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबांसाठी ९२ हजार १0३ स्वतंत्र शौचालयाची निर्मिती करण्यात आली. दारिद्रय़ रेषेवरील कुटुंबांसाठी ९७ हजार २0३ स्वतंत्र शौचालयाचे बांधकाम करण्यात आले. ७२८ ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले, तर ५८00 अंगणवाडींना स्वतंत्र शौचालय उपलब्ध करून दिले आहे. २0१२-१३ मध्ये या चार प्रकारात एकूण एक लाख ९५ हजार ८३४ स्वतंत्र शौचालयाची निर्मिती करण्यात आली. २0१३-१४ या वर्षासाठी दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबांसाठी दोन लाख २९ हजार २४३, दारिद्रय़ रेषेवरील कुटुंबांसाठी चार लाख ५३ हजार ७९२ स्वतंत्र शौचालय निर्मिती तसेच १५२४ ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी दोन लाख ६७ हजार ४२४ शौचालयांची बांधणी करण्यात आली आहे. दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबांसाठी ९३ हजार १५६, दारिद्रय़ रेषेवरील कुटुंबांसाठी एक लाख ७४ हजार १0७, तसेच सार्वजनिक ठिकाणी १६१ शौचालयांची बांधणी निर्मल भारत अभियानाने केली आहे. उद्दिष्टपूर्तीच्या ५0 टक्क्यापर्यंतही निर्मल भारत अभियान पोहोचू शकले नाही. अर्थात गाव पातळीवरील व तालुका पातळीवरील सर्व विभागांचे उत्तम सहकार्य मिळाले असते, तर ५0 टक्क्यांपेक्षाही जास्त उद्दिष्टपूर्ती झाली असती, असा अधिकार्यांकडून केला जात आहे.