संतोष वानखडे/वाशिम : जिल्ह्यातील ३९ जलस्त्रोत दूषित असल्याचे, जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेने ऑक्टोबर महिन्यात केलेल्या पाणी नमुने तपासणीतून समोर आले. दूषित पाणीपुरवठा व ब्लिचिंग पावडरचा वापर न केल्याप्रकरणी मे महिन्यात तब्बल ९६ ग्रामसेवकांवर जिल्हा परिषदेने कारवाई केली होती. काळ लोटला, तसा कारवाईचा धाकही संपतोय, या मानसिकतेत काही कर्मचारी असल्याचे पाणी नमुने तपासणीने अधोरेखीत केले. ग्रामीण भागात सर्वांंना स्वच्छ, शुद्ध व पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी शासनाने ग्रामपंचायत प्रशासनावर सोपविली आहे. पाणीपुरवठय़ाच्या विहिरीत तसेच गावात पिण्यासाठी वापरात असलेल्या जलस्त्रोतात पुरेशा प्रमाणात ब्लिचिंग पावडर टाकणे क्रमप्राप्त असताना, काही ग्रामपंचायती ब्लिचिंग पावडरचा योग्य प्रमाणात वापर करीत नाहीत. गत मे महिन्यात जिल्ह्यातील ८0 जलस्त्रोत दूषित असल्याचे तसेच अनेक ग्रामपंचायतीने पाण्यात ब्लिचिंग पावडरचा वापर केला नसल्याचे समोर आले होते. यासंदर्भात ह्यलोकमतह्णने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. आमदार राजेंद्र पाटणी यांनी विधिमंडळाच्या उन्हाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडली. तातडीने जिल्हा परिषद प्रशासनाने तब्बल ९६ ग्रामसेवकांवर वेतनवाढ रोखने व अन्य प्रकारची कारवाई केली होती. या कारवाईनंतर दोन-तीन महिने शुद्ध पाणीपुरवठा व ब्लिचिंग पावडरचा योग्य प्रमाणात वापर झाला. त्यानंतर अनियमितता आली आणि सप्टेंबर महिन्यात तब्बल १३४ जलस्त्रोत दूषित आढळून आले. ऑक्टोबरमध्ये या संख्येत घट आली. जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेने केलेल्या पाणी नमुने तपासणीतून एकूण ३९ जलस्त्रोत दूषित आढळून आले. एकूण ६१३ जलस्त्रोत तपासले होते. मानोरा तालुक्यात तपासलेल्या १३९ पैकी २२ जलस्त्रोत दूषित आढळून आले. याप्रमाणे मंगरुळपीर तालुक्यात आठ, रिसोड पाच, कारंजा तालुक्यात चार जलस्त्रोत दूषित आढळून आले.
३९ जलस्त्रोत दूषित; आरोग्याला धोका
By admin | Published: November 27, 2015 1:46 AM