वाशिम : जगभरातील बंजारा समाज बांधवांची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पोहरादेवी-उमरी तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्यातील सुधारित कामांना २० ऑक्टोबर रोजी आढावा सभेत मान्यता देण्यात आली. पूर्वी १६७.९ कोटी रुपयांचा आराखडा आता २३०.६५ कोटी रुपयांची वाढ केल्याने एकूण ३९७.७४ कोटींचा झाला आहे. त्यातून होणारी कामे दर्जेदार असावी, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी आढावा सभेत दिले.
जिल्हास्तरीय तीर्थक्षेत्र विकास समितीच्या या सभेत पालकमंत्री म्हणाले, कोट्यवधी बंजारा समाज बांधवांचे पोहरादेवी हे मुख्य तीर्थक्षेत्र आहे. पोहरादेवी व उमरी तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी शासनस्तरावरून भरीव निधीची तरतूद करण्यात आली असून तीर्थक्षेत्र विकास आराखडयाअंतर्गत होणारी सर्व कामे गुणवत्तापूर्ण असावी, अशा सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी खासदार भावना गवळी, आमदार ऍड. किरणराव सरनाईक, आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनीता आंबरे, कार्यकारी अभियंता सुभाष राऊत, नीता बोकडे, महावितरणचे अधीक्षक अभियंता ए.व्ही. शिंदे, कार्यकारी अभियंता जी.एस. चव्हाण आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
नंगारा भवनात सीसीटीव्ही, उमरीत दोन हेलीपॅडपोहरादेवी व उमरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील सर्व कामांचे अंतिम नकाशे आठ दिवसांत उपलब्ध करून द्यावे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, नंगारा भवनच्या सर्व मजल्यावर आणि बाहेरच्या भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे. उमरी परिसरात कायमस्वरूपी दोन हेलिपॅडची उभारणी करावी. २२ डिसेंबरपर्यंत संत सेवालाल महाराज समाधी मंदिर आणि नंगारा वास्तू संग्रहालयाची कामे पूर्ण करण्यात यावी, असे ते म्हणाले.