वाशिम : घरकुलाचे बांधकाम पूर्ण झालेल्या लाभार्थींच्या गृहप्रवेश समारंभाचा अनोखा उपक्रम जिल्हा परिषदेने हाती घेतला असून, हिवरा लाहे येथील ४० लाभार्थींच्या गृहप्रवेशाला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह तीन सभापती, प्रकल्प संचालक, गटविकास अधिकाऱ्यांनीदेखील हजेरी लावली.
रमाई आवास, प्रधानमंत्री आवास योजनेतून पात्र लाभार्थींना घरकुलाचा लाभ दिला जातो. अमृत महाआवास अभियान (ग्रामीण) अंतर्गत घरकुलाबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती केली जात आहे. घरकुल बांधकाम पूर्ण झाल्यानंतर लाभार्थींचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी गृहप्रवेश समारंभ जिल्हा परिषदेने हाती घेतला. महिला व बालकल्याण सभापती वैशाली प्रमोद लळे यांच्या जि.प. गटातील हिवरा लाहे येथे रमाई आवास योजनेचे ४० व प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २० घरकुलांचा गृहप्रवेश समारंभ पार पडला.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, महिला व बालकल्याण सभापती वैशाली प्रमोद लळे, समाजकल्याण सभापती अशोक डोंगरदिवे, कारंजा पंचायत समिती सभापती प्रदीप देशमुख, प्रकल्प संचालक किरण कोवे, पं.स. सदस्य किशोर ढाकुलकार, सरपंच वर्षा गजानन लाहे, गटविकास अधिकारी एस.पी. पडघन, माजी जि.प. सदस्य प्रमोद पाटील लळे, उपसरपंच विलास मनवर, ग्रामसेवक एम.के. मोहाळे आदींची उपस्थिती होती. गृहप्रवेशाला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह तीन सभापती व अन्य अधिकारी पाहून लाभार्थींच्या चेहऱ्यावरही हास्य फुलले.