वाशिम - महासंचालकांचे आदेश डावलून पोलिसाने रॅलित पाेषाखावर नृत्य केल्यामुळे धनज येथील पोलीस कर्मचारी आकाश खंडारे यांना १० ऑक्टाेबर राेजी पाेलीस अधीक्षकांनी निलंबित केले. गत महिन्यात पार पडलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत पाेषाखात पोलिसांनी नृत्य केल्यामुळे वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी आदेश जारी करुन पोलिसांनी पाेषाखात मिरवणुकीत नाचू नये, असे निर्देश दिले होते.
मात्र, पोलीस महासंचालकांचे हे आदेश डावलून रविवारी कामरगावात एका धार्मिक रॅलित पोलिसाने पाेषाखात नृत्य केल्याचे दिसून आले. पोलिसाच्या या कृत्याचा व्हीडीओ व्हायरल झाला हाेता, याची चाैकशी करुन पाेलीस अधीक्षक यांनी १० ऑक्टाेबर राेजी त्या कर्मचाऱ्यास निलंबित केले.
असे असतानाही पोलीस स्टेशन धनज बु. अंतर्गत ९ ऑक्टोबर रोजी कामरगाव येथे मुस्लिम बांधवांनी ईद- ए- मिलाद निम्मित काढलेल्या रॅलित कामरगाव चौकीतील आकाश खंडारे या पोलीस कर्मचाऱ्याने कर्तव्यावर असताना खाकी पाेषाखात नृत्य केले होता. याचा व्हीडीओ व्हायरल झाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी १० ऑक्टोबर रोजी पोलीस कर्मचारी आकाश खंडारे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.