वाशिम: जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ४० महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. तर प्रमुख अतिथी म्हणून अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार, सहायक जिल्हाधिकारी मिन्नू पी. एम, अपूर्वा बासूर, निवासी उपजिल्हाधिकारी कैलाश देवरे, उपजिल्हाधिकारी मोहन जोशी, तेजश्री कोरे, उपविभागीय अधिकारी सर्वश्री ललीत वऱ्हाडे, सखाराम मुळे, व वैशाली देवकर यांची उपस्थिती होती.
यावेळी प्रत्येक ठिकाणी महसूल विभाग काम करतो. जिल्ह्यात उद्भवलेल्या पुरपरिस्थितीच्या काळात महसूलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सतर्क राहून काम केले. हा विभाग शासनाचा कणा म्हणून ओळखला जातो. प्रत्येक नागरिकाचा महसूल विभागाशी संबंध येतो. त्यामुळे नागरिकांची कामे करताना त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मितभाषी राहून नागरिकांना सौजन्याची वागणूक देऊन त्यांची कामे वेळेत पूर्ण करावी. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी केले.
या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरीसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी तेजश्री कोरे, मंगरुळपीर उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे तहसिलदार राहुल वानखेडे, मालेगांव तहसिलदार दिपक पुंडे, मंगरुळपीर तहसिलदार रवि राठोड, नायब तहसिलदार विनोद हरणे यांच्यासह नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, लघूलेखक, कारकून, शिपाई, कोतवाल, चालक अशा ४० अधिकारी, कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.