वाशिम : दुसऱ्या लाटेत कोरोनामुळे जनजीवन प्रभावित होत आहे. कोरोना म्हटला की, एकच धास्ती निर्माण होते. अगदी जवळच्या व्यक्तीपासूनही लोक दूर पळतात. त्यातही कोरोनाने मृत्यू ओढवला, तर नातेवाईक आणि मृत व्यक्तीत दरीच निर्माण होते. कुटुंबीयांना दुरूनच निरोप द्यावा लागतो. अशा परिस्थितीत जीवावर उदार होऊन रुग्णालयातील काही कंत्राटी कर्मचारी मृतदेह हाताळण्याचे काम करीत आहेत. या कंत्राटी कर्मचाºयांना मात्र दिवसाकाठी ४०० रुपयापर्यंत कंत्राटदाराकडून पैसे मिळतात. एवढ्या कमी पैशात हे कर्मचारी काम करीत आहेत, तेही कोणत्याही तक्रारीविना, फक्त माणुसकीचे नाते डोळ्यांसमोर ठेवून मृतदेहाचे पॅकिंग, वार्डातील स्वच्छतेचे काम करीत आहेत.
जिल्ह्यात मे महिन्यातही कोरोनाचा उद्रेक कायम आहे. या परिस्थितीत कामकाज करताना, वाढलेला ताण कमी करण्यासाठी रोजंदारीवर अनेक कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरातील जिल्हा कोविड हॉस्पिटल येथे स्वच्छतेचा कंत्राट दिलेले कर्मचारी हे स्वच्छतेबरोबरच मृतदेहाचे पॅकिंग करण्याचे कामही करतात. स्वत:च्या जीवावर उदार होऊन काम करणारी ही मंडळी कोरोनाच्या भयावह स्थितीतही अहोरात्र काम करीत आहे. यामध्ये मृतदेहाचे पॅकिंग आणि त्याचे शिफ्टिंग करणारी यंत्रणा आहे. सोबतच नगरपरिषदेचे कायमस्वरूपी कर्मचारीही या कामी मदत करीत असतात. ही संपूर्ण यंत्रणा जीवाची पर्वा न करता कामकाज करीत आहे. या परिस्थितीत कुटुंबाला सुरक्षित ठेवण्याचे कामही त्यांनी पार पाडावे आहे. या कर्मचाऱ्यांचा सेवाभाव पाहून त्यांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेतल्यास या कुटुंबाला मोठा हातभार लागणार आहे. जीवाची जोखीम उचलणाऱ्या या कर्मचाऱ्यांना केवळ ४०० रुपयांदरम्यान दैनंदिन रोज मिळतो. त्यांना यापेक्षा जास्त मोबदला मिळाल्यास कुटुंबासाठी हातभार लावता येणार आहे.
००००००००००००
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंत्राटी पद्धतीने भरलेली पदे-२०
दिवसाला रोजगार-४०० रुपये
कंत्राट ०३ महिन्यांचे
----.......................
काय असते काम?
कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला जात नाही. सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असताना, एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला, तर त्याचा मृतदेह वॉर्डातून शवागृहात, तसेच नगरपरिषदेच्या वाहनापर्यंत आणला जातो. वॉर्डातून मृतदेह आणण्यापूर्वी वॉर्डातच मृतदेह एका विशिष्ट पॅकिंग बॅगमध्ये बंदिस्त केला जातो.
याशिवाय जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरातील कोविड हॉस्पिटलमध्ये दैनंदिन स्वच्छतेचे काम करावे लागते. शौचालय, स्वच्छतागृहाची स्वच्छताही करावी लागते. कोरोनाच्या काळात स्वच्छता आणि मृतदेह पॅकिंगचे काम करीत असल्यामुळे शासन सेवेत सामावून घ्यावी, अशी मागणीही कंत्राट कर्मचाऱ्यांमधून होत आहे.
०००००
बॉक्स
पोट भरेल एवढे पैसे द्या, नोकरीत कायमस्वरूपी घ्या!
- सर्व कर्मचारी अहोरात्र काम करीत असतात. ज्या मृतदेहाला नातेवाईकही घेण्यासाठी तयार नसतात, अशा मृतदेहाचे पॅकिंग, नगरपरिषदेच्या वाहनापर्यंत आणणे आदी कामे ही मंडळी करतात. अहोरात्र वॉर्डात काम करणारी ही मंडळी रोजंदारीवर आहे.
- मृतदेह पॅक करण्याचे काम करताना, पैशांचा कधीही विचार केला नाही. कोरोनासारख्या महामारीत काम मिळाले, हे अधिक महत्त्वाचे वाटते, असे काही कर्मचाऱ्यांनी म्हटले.
- जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीत घेण्यात यावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे. या कर्मचाऱ्यांना विम्याचे सुरक्षा कवच मिळावे, आजारपणात त्यांच्या उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था असावी.
- वेतन अधिक मिळावे, ही कोणत्याही क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची इच्छा असते, पण हे काम नाही, तर एक जबाबदारी आहे, एक प्रकारे रुग्णसेवा असल्याचेही कर्मचारी म्हणाले.
०००००००००००
मृतदेहांचे पॅकिंग आणि शिफ्टिंग, कामाचे मोल ओळखावे
महिन्याला ११ हजारांच्या आसपास वेतन मिळते. आजपर्यंत कधी वेतनाचा विचार केला नाही. माणुसकी म्हणूनच मृतदेह पॅकिंगचे काम करतो, स्वच्छतेचे काम करतो, हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. हे काम करताना कधीही भीती वाटली नाही. स्वत: योग्य काळजी घेऊनच काम करतो.
- एक कंत्राटी कर्मचारी
------
बॉक्स
खासगी रुग्णालयात कंपाउंडरच करतोय पॅकिंग
खासगी कोविड रुग्णालयात उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला, तर तेथे कार्यरत कंपाउंडरच मृतदेहाची व्यवस्थित पॅकिंग करतात. पॅकिंग करताना योग्य ती काळजी घेतली जाते. या कंपाउंडरलाही ७ ते १२ हजारांदरम्यान दरमहा वेतन दिले जाते.
००००००
बॉक्स
नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी कायमस्वरूपी
सरकारी, तसेच खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला, तर रुग्णालय ते स्मशानभूमी या दरम्यान वाहनातून मृतदेह नेण्याची जबाबदारी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. नगरपरिषदेचे कर्मचारी हे रुग्णालयातून मृतदेह हा स्मशानभूमीपर्यंत आणणे आणि अंतिम संस्कार होईपर्यंत तेथेच राहतात. ही कामे करणारे कर्मचारी हे कायमस्वरूपी असल्याचे नगरपरिषदेने स्पष्ट केले.
००००००००