वाशिम: रास्तभाव दुकानदार, केरोसिन विक्रेत्यांना बँकांचे व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून नेमणूक देण्याच्या राज्य शासनाच्या संकल्पनेला वाशिम जिल्ह्यात तडा जात असल्याचे दिसून येते. एका वर्षापूर्वी पुरवठा विभागाने संबंधित बँकांकडे पाठविलेले ४१९ रेशन दुकानदारांचे प्रस्ताव अद्याप लालफितशाहीत असून, बँकांची उदासिनता यामागे कारणीभूत असल्याचे सांगितले जाते.
जिल्ह्यातील रास्तभाव व केरोसीन विक्रेत्यांना व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून काम मिळावे आणि यायोगे त्यांना प्रतिमाह ठराविक मानधन मिळावे, नागरिकांची सोय व्हावी आणि बँकांवरील अतिरिक्त कामाचा बोजाही कमी व्हावा, या उद्देशाने डिसेंबर २०१६ मध्ये शासनाने कार्यपद्धती निश्चित केली. त्यानुसार, रास्तभाव दुकानदारांना बँकांचे व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्यासाठी विशेष आराखडा तयार केला होता. जिल्ह्यात ७७४ रास्तभाव दुकानदार आणि ८५४ केरोसिन विक्रेते आहेत. बँकांचे व्यावसायिक प्रतिनिधी बनण्यास इच्छूक असलेल्या रेशन दुकानदारांकडून पुरवठा विभागाने प्रस्ताव बोलाविले होते. ३६५ रास्तभाव दुकानदार आणि ४४ किरकोळ केरोसीन अशा ४१९ दुकानदारांनी पुरवठा विभागाकडे संमतीपत्र जमा केले. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा विभागाने या प्रस्तावांची छाननी करून संबंधित बँकांकडे पुढील कार्यवाहीसाठी प्रस्ताव सुपूर्द केले. मात्र, या प्रक्रियेस एका वर्षाचा कालावधी लोटला असताना एकाही दुकानदाराची नेमणूक करण्यात आलेली नाही. लालफितशाहीत अडकलेले प्रस्ताव लवकर निकाली निघावे, अशी अपेक्षा रेशन दुकानदारांमधून व्यक्त होत आहे.