वाशिम : सन २०२२-२३ या वर्षातील रिक्त असलेल्या पोलिस शिपाई संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांना शारीरिक चाचणी कधी घेतले जाते, याकडे लक्ष लागले होते. अखेर त्याबाबतचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून, वाशिम जिल्हा पोलिस दलात अर्ज केलेल्या उमेदवारांची १९ जूनपासून जिल्हा पोलिस कवायत मैदानावर शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे. त्यामुळे भावी पोलिसांनी, कागदपत्रे तयार करून मैदानी चाचणीसाठी सज्ज राहणे आवश्यक आहे.
राज्यातील रिक्त असलेल्या पोलिस शिपाई संवर्गातील पोलिस शिपाई, पोलिस शिपाई चालक, बँडस्मन, सशस्त्र पोलिस शिपाई आणि कारागृह शिपाई भरती-२०२३ करिता देण्यात आलेल्या जाहिरातीनुसार भरती प्रक्रिया राबविण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. जिल्हा पोलिस दलात रिक्त असलेल्या ६८ जागांसाठी ४ हजार २७९ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. प्रथम ५० गुणांची मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. यामधून ५० टक्के गुण मिळणारे उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गातील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या १:१० प्रमाणात उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा राज्यस्तरावरील निर्णय प्रक्रियेनुसार घेतली जाणार आहे. लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य असेल. त्यापेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजले जाणार आहेत.
जागा ६८; अर्ज ४,२७९
वाशिम जिल्हा पोलिस दलात सन २०२२-२३ या वर्षात रिक्त झालेल्या ६८ पोलिस शिपाई पदाची भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. विहित मुदतीत ४ हजार २७९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये पुरुष ३७६० तर ५१९ महिलांचा समावेश आहे.