कारंजा लाड: येथील महसूल विभागाच्यावतीने जमीन अकृषक करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. एकूण ४५ अर्ज प्राप्त झाले असून, आता या अर्जांतील कागदपत्रांची पडताळणी तसेच त्रुटींंची पूर्तता करून पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती तहसिलदार सचिन पाटील यांनी सोमवारी दिली.
महाराष्ट्र जमीन संहितेच्या नवीन कलम ४२ ब, ४२ क व ४२ ड नुसार अकृषक आकारणी करून जमीन अकृषक वापरात रूपांतरीत करण्यासाठी कारंजा येथील तहसिल कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या निर्देशाखाली १६ मार्चपासून शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गावठाण्याच्या हद्दीपासून २०० मीटरच्या आतील भूधारकांकडून यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये उपरोक्त कलमांतील ४२ ब नुसार अंतिम विकास योजना क्षेत्रात समाविष्ट असलेल्या जमिनीसाठी, जमिन वापरात बदल करण्यासाठी योजना प्रसिध्द केल्यावर यामधील क्षेत्रासाठी रूपांतरण कर, अकृषिक आकारणी आणि लागू असेल त्याठिकाणी नजराना किंवा अदिमूल्य आणि इतर शासकीय देणी यांचा भरणा केला असेल तर अशा क्षेत्रात समाविष्ट असलेल्या कोणत्याही जमिनीचा वापर हा विकास योजनेत दर्शविलेल्या वापरात रूपांतरीत करण्यात येणार आहे. जमिन अकृषक करण्यासाठी एकूण ४५ अर्ज आलेले असून, त्या अनुषंगाने आता पुढील कार्यवाही केली जाणार आहे. सर्वप्रथम अर्जांतील कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. काही त्रूटी आढळून आल्यास, या त्रूटींची पुर्तता केली जाणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे, असे तहसिलदार पाटील यांनी सांगितले.