वाशिम - ग्रामपंचायत स्तरावरून प्राप्त प्रस्तावानुसार जिल्ह्यातील ४२ गावांत ४५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून, आठ गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. दरम्यान, संभाव्य टंचाई लक्षात घेता संबंधित ग्रामपंचायतने उपाययोजनेच्या १५ दिवसांपूर्वी संबंधित गटविकास अधिकाºयांकडे विहिर अधिग्रहण, टँकर व अन्य उपाययोजनेसाठी प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख यांनी गुरूवारी केल्या.
गतवर्षी पावसाने सरासरी गाठली नसल्याने यावर्षी अनेक गावांत पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. टंचाईग्रस्त गावांत उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या असून, ग्रामपंचायतकडून प्राप्त प्रस्तावानुसार उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाते. ५१० गावांमध्ये पाणीटंचाई निवारणार्थ ५७८ उपाययोजना प्रस्तावित असून, त्यासाठी ४ कोटी ४८ लाख ५३ हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. विहिर, बोअर अधिग्रहणासाठी ४२ ग्रामपंचायतचे प्रस्ताव निकाली काढले असून, ४५ विहिर, बोअरचे अधिग्रहण करण्यात आले. यामध्ये वाशिम तालुक्यातील १८ गावांत २० विहिर, बोअर अधिग्रहण, मंगरूळपीर तालुक्यातील ३ गावांत चार विहिर, बोअर अधिग्रहण, मानोरा तालुक्यातील १४ गावांत १४ विहिर, बोअर अधिग्रहण, कारंजा तालुक्यातील सात गावांत सात विहिर, बोअर अधिग्रहण करण्यात आले आहेत. तसेच आठ गावांत आठ टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. यामध्ये वाशिम तालुक्यातील दोन गावे, मानोरा तालुक्यातील चार गावे आणि कारंजा तालुक्यातील दोन गावांचा समावेश आहे.
दरम्यान, जेथे पाणीटंचाई उद्भवणार आहे, अशा ग्रामपंचायतच्या सचिवांनी १५ दिवसांपूर्वी उपाययोजनेसंदर्भात संबंधित गटविकास अधिकाºयांकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. या प्रस्तावाच्या अनुषंगाने उपाययोजना करता येतील. त्यामुळे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाºयांनी गावातील पाणीटंचाईसंदर्भात सतर्क राहून १५ दिवसांपूर्वी संबंधित गटविकास अधिकाºयांकडे प्रस्ताव सादर करावे, अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी केल्या. प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने संबंधित गावात उपाययोजना केल्या जाणार आहेत. पाणीटंचाई निवारणार्थच्या कामात संबंधित कर्मचाºयांची हयगय, दिरंगाई खपवून घेणार नाही, असा इशाराही देशमुख यांनी दिला.