लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनाच्या सावटाखाली २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. ४२ दिवसांनंतर कनिष्ठ महाविद्यालय, शाळेतील विद्यार्थी उपस्थिती ४६ टक्क्यांवर पोहोचली असून, ३७ हजार ७९० विद्यार्थ्यांना शिक्षणाचे प्रत्यक्ष धडे मिळाले. गत दोन महिन्यांपासून कोरोनाचा आलेख खाली आल्याने २३ नोव्हेंबर रोजी शाळेची पहिली घंटा वाजली. जिल्ह्यात नववी ते बारावीपर्यंत शिक्षण देणाऱ्या ३६३ शाळा असून, येथे ८२ हजार १५१ विद्यार्थी संख्या आहे. या शाळेत २५५१ शिक्षक आणि १६६८ शिक्षकेतर कर्मचारी आहेत. आतापर्यंत सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चाचणी झाली असून, यापैकी ५१ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. २ जानेवारीपर्यंत शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती ४६ टक्क्यांवर पोहोचली. ८२ हजार १५१ पैकी ३७ हजार ७९० विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नोंद झाली आहे. महिनाभरात जिल्ह्यातील एकही विद्यार्थी संक्रमित नाहीशाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ‘कोविड-१९’च्या नियमाचे पालन करून शिकविण्यात येत आहे. तपासणी केल्यानंतरच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात येतो. शाळा सुरू झाल्याच्या ४२ दिवसात एकाही विद्यार्थ्याला कोरोना संसर्ग झाला नाही.
जिल्ह्यात इयत्ता नववी ते बारावीपर्यंत शिक्षण देणाऱ्या ३६३ शाळा आहेत. आतापर्यंत ३५३ शाळा सुरू झाल्या आहेत. ज्या शाळेत कर्मचारी किंवा शिक्षकाचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला, त्या शाळा बंद आहेत. उर्वरित सर्व शाळा सुरू असून, विद्यार्थी उपस्थिती सरासरी ४६ टक्क्यांवर पोहोचली आहे. - रमेश तांगडे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वाशिम