वाशिम: जिल्ह्यात यंदाच्या हंगामात आजवर ४५ हजार ८०५ क्विंटल कापसाची खरेदी बाजार समित्यांमध्ये झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कपाशीची खरेदी मंगरुळपीर बाजार समिती अंतर्गत झाली आहे. या बाजार समिती अंतर्गत व्यापाºयांनी जवळपास १७ हजार क्विंटल कपाशीची खरेदी केली आहे.
यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात ३० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कपाशीची पेरणी करण्यात आली होती. त्यामध्ये सर्वाधिक प्रमाण मानोरा आणि कारंजा तालुक्यात होते. कपाशी पहिल्या वेच्यावर आली असतानाच शेंदरी बोंडअळीने आक्रमण केल्यामुळे या शेतमालाच्या उत्पादनात मोठी घट झाली. त्यापूर्वी जिल्ह्यात हमीभावाने खरेदी करण्यासाठी मानोरा, मंगरुळपीर आणि कारंजा या तीन तालुक्यात पणन संघाचे केंद्र सुरू करण्यात आले; परंतु शासकीय केंद्रावर दर्जानुसार भाव मिळत असताना व्यापाºयांकडून त्यापेक्षा अधिक दर मिळत असल्याने शेतकºयांनी शासकीय खरेदी केंद्रांकडे पाठच केली. उपनिबंधक कार्यालयाकडून घेतलेल्या माहितीनुसार वाशिम जिल्ह्यात आजवर ४५ हजार ८०५ क्विंटलपेक्षा अधिक कपाशीची खरेदी बाजार समित्यांमध्ये लिलाव पद्धतीने व्यापाºयांकडून करण्यात आली आहे. जिल्ह्यात मंगरुळपीर, मानोरा, कारंजा आणि वाशिम या बाजार समित्यांतर्गत कपाशीची खरेदी करण्यात येत आहे. त्यामध्ये मंगरुळपीर बाजार समिती अंतर्गत सर्वाधिक १६ हजार ९०० क्विंटलहून अधिक कपाशीची खरेदी झाली आहे. त्या खालोखाल कारंजा बाजार समिती अंतर्गत १४ हजार ५०० क्विंटलहून अधिक, मानोरा बाजार समिती अंतर्गत ९ हजार क्विंटलहून अधिक, तर वाशिम बाजार समिती अंतर्गत ५ हजार क्विंटलहून अधिक कपाशीची खरेदी झाली आहे. सद्यस्थितीत व्यापाºयांकडून कपाशीला किमान ४८०० ते कमाल ५२०० रुपये प्रति क्विंटलचे दर मिळत आहेत.
शासकीय खरेदी केंद्र निरंकच
जिल्ह्यात कपाशीची हमीभावाने खरेदी करण्यासाठी वाशिम जिल्ह्यात पणन महासंघाची तीन केंद्र २५ आॅक्टोबर रोजी सुरू करण्यात आली; परंतु गत अडिच महिन्यांत या तिन्ही केंद्रांवर मिळून एक क्विंटलही कापूस खरेदी होऊ शकला नाही. बाजार समित्यांमध्ये व्यापाºयांकडून हमीभावापेक्षा तब्बल एक हजार रुपये अधिक दर मिळत असल्याने शेतकरी व्यापाºयांकडेच कपाशीच्या विक्रीवर भर देत आहेत. शासनाचे हमीदर ४३२० असताना व्यापाºयांकडून ५२०० रुपयांपर्यंत कपाशीला भाव मिळत असल्याने शेतकºयांनी व्यापाºयांकडेच कपाशी विक्रीवर जोर दिला, हे प्राप्त आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.