लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: खरीप हंगामासाठी जिल्हाभरातील ५ ऑगस्ट रोजीच्या अंतिम मुदतीपर्यंत ४६ हजार ७२१ शेतकर्यांनी पीक विमा काढला आहे. त्यामध्ये कर्जदार शेतकर्यांची संख्या ३४ हजार ४३९, तर बिगर कर्जदार शेतकर्यांची संख्या १२ हजार २८२ असल्याची माहिती सूत्रांनी मंगळवार, ८ ऑगस्ट रोजी दिली.संपूर्ण देशभरासाठी पंतप्रधान पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यातील पीक विम्याची जबाबदारी रिलायन्स कंपनीवर सोपविण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास संबंधित शेतकर्याला आर्थिक मदत मिळावी, किमान त्याचा उत्पादन खर्च भरून निघावा. या उद्देशाने पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. जवळपास सर्वच पिकांचा विविध पिकांचा विमा काढला जातो. तथापि, वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीन पीक प्रामुख्याने घेतले जाते. त्यामुळे सोयाबीनच्या पिक विम्याचे प्रमाण जिल्ह्यात सर्वाधिक आहे. सर्वच राष्ट्रीयकृत बँकांद्वारे पीकविमा उतरविणया प्रक्रिया राबविण्यात येते. त्यातच पीक कर्ज घेणार्या शेतकर्यांना पीक विमा काढणे सक्तीचे असल्यामुळे यंदाही जिल्ह्यात पीकविमा काढणार्या शेतकर्यांचीच संख्या अधिक आहे. जिल्हा अग्रणी बँकेतून प्राप्त आकडेवारीनुसार जिल्ह्यातील ३४ हजार ४३९ कर्जदार शेतकर्यांनी पीक विमा काढला, तर बिगर कर्जदार शेतकर्यांपैकी १२ हजार २८२ शेतकर्यांनी पीक विमा काढला आहे. कर्जदार शेतकर्यांच्या पीक कर्जाच्या रकमेतून पीक विम्याची रक्कम वजा केली जाते. त्यामुळे त्यांना स्वतंत्र पीक विमा काढण्याची गरज पडत नाही. प्रती एकरी ठरविलेली रक्कम सातबारासह बँकेत जमा केल्यानंतर शेतकर्याने नोंदविलेल्या संबंधित पिकाचा विमा निघतो. त्यानुसार, जिल्हाभरातील ४६ हजार ७२१ शेतकर्यांनी पीक विमा काढला आहे. यापूर्वी पीक विमा काढणार्या शेतकर्यांची संख्या अतिशय कमी होती. मात्र कर्ज घेणार्या शेतकर्यांना विम्याची सक्ती केल्याने पीक विमा काढणार्यांची संख्या वाढली आहे.
६ कोटी ३0 लाख रुपयांचा भरणा!वाशिम जिल्ह्यात विविध पिकांचा विमा काढणार्या ४६ हजार शेतकर्यांपैकी पीककर्ज काढलेल्या ३४ हजार ३४९ शेतकर्यांकडून विविध बँकांनी त्यांच्या पीककर्जाच्या रक मेतून पिकविम्यापोटी ४ कोटी ८७ लाखांची रक्कम कपात केली आहे. तथापि, बिगर कर्जदार शेतकर्यांकडून या योजनेला मुदतवाढीनंतर प्रतिसाद लाभल्याने प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ५ ऑगस्ट रोजीच्या अंतिम मुदतीपर्यंत एकूण १२ हजार २८१ शेतकर्यांनी मिळून पीकविम्यापोटी विविध बँकांत १ कोटी ४३ लाख २१ हजार रुपयांचा भरणा केला आहे. संभाव्य पीक नुकसानीनंतर पीकविम्यासाठी असलेल्या निकषानुसार उपरोक्त सर्व शेतकर्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे नैसर्गिक किंवा इतर आपत्तीमुळे होणार्या नुकसानापासून त्यांना सुरक्षा मिळाली आहे.