वाशिम : सन २०२३-२४ च्या खरीप हंगामातील प्रमुख पिकांची जिल्ह्याची सरासरी अंतिम पैसेवारी ४८ पैसे इतकी असल्याचे जिल्हा प्रशासनाने शनिवारी जाहीर केले आहे. जिल्ह्यात एकूण ७९३ महसूल गावे आहेत. या सर्वच गावांची खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे.
जिल्ह्यात यंदा सुरुवातीपासून खरीप हंगामात योग्य पाऊस झाला नाही. विलंबाने पाऊस झाल्यामुळे पेरणी लांबणीवर पडली. परिणामी खरिपातील मूग, उडीद पिकांचा पेरा घटला. पेरणी झाल्यानंतर काही भागात जुलैच्या अखेरीस अतिवृष्टी झाली. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर ऑगस्टमध्ये २० ते २५ दिवस पावसाने खंड दिला. त्यातच पिकावर येलो मोझॅक व इतर रोगांच्या प्रादुर्भावामुळे उभे सोयाबीनचे पीक सुकून गेले. ही परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने ३१ ऑक्टोबरला जिल्ह्याची सुधारित पैसेवारी ४८ पैसे काढली होती. त्यानंतर अंतिम पैसेवारी किती निघते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. जिल्हा प्रशासनाने ३० डिसेंबरला जाहीर केलेल्या अंतिम पैसेवारीमध्ये सर्वच महसुली गावांची पैसेवारी ५० पैक्षा कमी निघाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना विविध सवलती लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्यात यंदा अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे शासनाने यापूर्वीच काही मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे.
तालुकानिहाय पैसेवारी
तालुका-गावे-पैसेवारीवाशिम -१३१-४८मालेगाव-१२२-४९रिसोड-१००-४७मंगरुळपीर-१३७-४७कारंजा-१६७-४७मानोरा-१३६-४८